न्यू-यॉर्क - सोशल मीडियाच्या जगात अग्रगण्य आणि नावाजलेली असलेल्या फेसबुकवर डेटाचोरीच्या प्रकरणामुळे नामुष्कीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मार्क झुकेरबर्गला माफी मागावी लागली. भारतासारख्या देशातील आगामी निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी फेसबुक आपल्या सुरक्षा सुविधेत वाढ करणार असल्याचे त्याला सांगावे लागले आहे. मार्क झुकेरबर्गनं माफी मागूनही केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणामुळे फेसबुकसमोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण, अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी त्यांच्या 'स्पेस एक्स' आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या 'टेस्ला' या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले आहेत. केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर एखाद्या कंपनीने फेसबुकवरील पेज बंद करण्याची ही पहिलीच घटना आहे. फेसबुकसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
फेसबुक डेटा चोरी प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने एलॉन मस्क यांना फेसबुकवरील 'स्पेस एक्स'चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनीदेखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला जोर का झटका दिला आहे. 'आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले. फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने कंपनीला फटका बसणार नाही, असंही ते म्हणालेत.
फेसबुक लॉग इनची माहिती विकली जाते फक्त ३४० रुपयांतफेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्यासाठी अमूल्य असणारे फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ ३४० रुपयांना विकले जात असल्याचे एका कंपनीने निदर्शनास आणले आहे. अमेरिकेतील निवडणुकीसाठी ५ कोटी फेसबुक युजर्सचे लॉग इन डिटेल्स चोरण्यात आले होते. ही माहिती जर वरील किमतीला विकली असेल तर त्याचे मूल्य जवळपास १७०० कोटी रुपये एवढे आहे.
फेसबुकसोबत आपण जे अॅप अटॅच करतो, एखाद्या फोटोशी तुलना करण्यासाठी, स्वभावाविषयी जाणून घेऊन ते पोस्ट करण्यासाठी आपण जिथे लॉग इन करतो, अशा अॅपच्या माध्यमातून ही डेटाचोरी होऊ लागली आहे. बिटनमधील रिसर्च कंपनी केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने डेटाचोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा असंख्य कंपन्यांनी आतापर्यंत फेसबुकवरून डेटा चोरला आहे. डार्क वेब मार्केटमध्ये जिथे कोणतेच वैध व्यवहार होत नाहीत, तिथे तुमचा हा डेटा जाहिरातदारांना, रिसर्च कंपन्यांना विकला जातो. ड्रीम, पॉइंट आणि वॉल स्ट्रीट मार्केट अशा तीन डार्क वेब मार्केटचा अभ्यास एका कंपनीने केला आहे.