कॅनडाच्या लोकांनाच जस्टीन ट्रुडो झाले 'नकोसे'; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 04:07 PM2023-09-22T16:07:09+5:302023-09-22T16:10:15+5:30
भारताशी कॅनडाचे राजकीय संबंध तणावपूर्ण होताच लोकप्रियता घटली
Canada Justin Trudeau: भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सुरूवातीला कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर घणाघाती आरोप केले. त्यानंतर भारताने कॅनडावर दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचा आरोप केला. या साऱ्या भानगडीत दोन्ही देशांतील नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. त्यामुळे कॅनडाच्या नागरिकांना त्यांच्या पसंतीचा पंतप्रधान कोण असा प्रश्न एका सर्वेक्षणानुसार विचारण्यात आला. तर त्यात ट्रुडो यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून आले.
कॅनडास्थित न्यूज प्लॅटफॉर्म ग्लोबल न्यूजसाठी केलेल्या नवीन IPSOS सर्वेक्षणानुसार, विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पॉइलीव्हरे हे 40 टक्के कॅनेडियन लोकांच्या पसंतीचे पंतप्रधान आहेत आणि जस्टिन ट्रूडो त्यांच्या मागे आहेत. ग्लोबल न्यूजच्या अहवालानुसार, नेत्यांमधील फरक सूचित करतो की 2025 मध्ये पुढील निवडणुकीत सरकार स्थापन करण्यासाठी कंझर्वेटिव्हना बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कॅनडाची अर्थव्यवस्था, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माण यासंबंधीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की बहुतेक कॅनेडियनांना असे वाटते की पॉइलिव्ह्रेकडे तिन्ही क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम योजना आहेत.
फरक किती?
कंझर्व्हेटिव्ह नेते पियरे पॉइलीव्हरे यांची लोकप्रियता सतत वाढत आहे आणि 40 टक्के कॅनेडियन म्हणतात की ते पंतप्रधान होण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. या प्रश्नावर त्यांची अनुकूलता एक वर्षापूर्वीच्या तुलनेत पाच पाँईंट्सने अधिक आहे. दुसरीकडे, पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना सर्वोत्तम पर्याय मानणाऱ्या प्रतिसादकर्त्यांची संख्या वर्षभरात 31 टक्क्यांवर स्थिर राहिली आहे.
खलिस्तान समर्थक NDP नेते जगमीत सिंग यांच्या पसंतीत घसरण
एनडीपी नेते जगमीत सिंग, जे खलिस्तान समर्थक आहेत आणि पीएम ट्रूडो यांचे सहयोगी आहेत, ते सप्टेंबर 2022 पासून चार टक्क्यांनी घसरले आहेत. केवळ 22 टक्केच कॅनडियन नागरिकांनाच वाटते की सरकारचे नेतृत्व करण्यासाठी ते सर्वोत्तम पर्याय आहेत.