Canada vs China Russia: कॅनडाने सोमवारी आपल्या संरक्षण खर्चात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला. कॅनडाला चीन आणि रशियाची भीती वाटते, त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी शस्त्रास्त्रांसाठी अधिकचा खर्च करण्यास मंजुरी दिल्याची चर्चा आहे. ट्रुडो यांनी देशाच्या सुरक्षेसाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि नवीन धोरणात्मक हेलिकॉप्टर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, ओंटारियो लष्करी तळावरील सरकार आपल्या किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी नवीन पाणबुड्या सामील करण्याचा विचार करत आहे. तसेच युनायटेड स्टेट्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांचे गुप्तचर एकमेकांना सहाय्य करत असलेल्या AUKUS सुरक्षा भागीदारीमध्ये सामील होण्यासाठीदेखील कॅनडा चर्चा करत आहे.
कॅनडाकडून सांगण्यात आले आहे की, पुढील आठवड्यात कॅनडाच्या सरकारच्या बजेटमध्ये नवीन निधीसाठी पाच वर्षांमध्ये $8.1 अब्ज (US$6 अब्ज) राखून ठेवले जाईल, जे त्याच्या सैन्यासाठी पुढील दोन दशकांमधील एकूण $73 अब्ज (US$54 बिलियन) चा एक भाग आहे. कॅनडाने याआधीच नौदलाची जहाजे आणि F-35 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) अंतर्गत महाद्वीपीय संरक्षणाचे आधुनिकीकरण करण्यासाठीही गुंतवणूक केली जाईल.
पंतप्रधान ट्रूडो म्हणाले की, आम्ही एका आव्हानात्मक काळात जगत आहोत. 20व्या शतकात आम्ही आमच्या लोकांना जगभरात आघाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता आम्ही नवीन आणि मोठे धोके ओळखून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आघाडीवर आहोत. चीन आणि रशियाकडे अंगुलीनिर्देश करताना ते म्हणाले की, नाटोने प्रत्येक सदस्य राष्ट्राच्या लष्करी खर्चासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) दोन टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. कॅनडावर शस्त्रास्त्रे खरेदी न केल्याने आणि संरक्षणावर खर्च न केल्याबद्दल टीका केली जाते, त्यामुळे आता आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.