“आम्ही हेच सांगतो होतो, अमेरिकेने केले शिक्कामोर्तब”; जस्टिन ट्रुडोची पुन्हा भारतावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:12 PM2023-11-30T12:12:59+5:302023-11-30T12:13:31+5:30
Canada PM Justin Trudeau: भारताला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे.
Canada PM Justin Trudeau: अमेरिकेतील भारतीय नागरिक निखिल गुप्ता याच्यावर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. यामध्ये भारताचा सहभाग असल्याचा दावाही केला जात आहे. यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा भारतावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. आम्ही हेच सुरुवातीपासून सांगत होतो. मात्र, अमेरिकेतून येणाऱ्या माहितीमुळे यावर शिक्कामोर्तब होत आहे, असे ट्रुडो यांनी सांगितले.
कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला आहे. मात्र, याबाबत कॅनडाकडून ठोस पुरावा देण्यात आलेला नाही. भारताकडून सातत्याने पुरावा देण्याची मागणी केली जात असून, तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अमेरिकेने केलेल्या दाव्यानंतर आता ट्रुडो म्हणाले की, अमेरिकेतून येणारी माहिती आम्ही जे आधीपासून सांगत होतो, त्याला अधोरेखित करणारी आहे. भारताला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. भारत सरकारने आमच्यासोबत काम करणे आवश्यक आहे जेणेकरून आम्ही या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ शकू, असे ट्रुडो यांनी म्हटले आहे.
भारताला तपासात सहकार्य करण्याचे आवाहन
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारत सरकारने आमच्यासोबत काम करण्याची गरज आहे, असे ट्रुडो यांनी सांगितले. याआधी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताला तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणावरही आरोपपत्र दाखल केलेले नाही. दुसरीकडे, अमेरिकेतील एका भारतीय नागरिकावर शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येच्या अयशस्वी कटात सहभागी असल्याचा आरोप केला. निखिल गुप्ता यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, ९ जून २०२३ रोजी किंवा त्याच्या आसपास निखिल गुप्ता यांने हत्या करण्याची सुपारी दिली होती. न्यूयॉर्क येथे एकाला १५ हजार यूएस डॉलर्स आगाऊ रक्कम म्हणून देण्याची व्यवस्था केली होती. एकूण १ लाख अमेरिकन डॉलर्स काम झाल्यावर देण्यात येणार होते. सुपारी घेणाऱ्या मारेकऱ्याने याबाबतची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे.