कॅनडा दहशतवाद्यांना मदत करतो, आमच्यासोबतही असेच केले; श्रीलंकेनेही ट्रुडो यांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 10:58 AM2023-09-26T10:58:53+5:302023-09-26T10:59:16+5:30
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता श्रीलंकेनेही कॅनडालाच्या पंतप्रधानांना फटकारले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या मृत्यूमध्ये भारताचा हात असल्याचा संशय घेणाऱ्या कॅनडावर श्रीलंका सरकारनेही प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दहशतवाद्यांना कॅनडात 'सुरक्षित आश्रय' सापडल्याचे श्रीलंकेचे म्हणणे आहे. त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावरही आरोप केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले...
न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेल्या श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या तणावावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'काही दहशतवाद्यांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रय मिळाला आहे. कॅनडाने कुठलाही पुरावा नसताना काही भडक आरोप केल्याबद्दल हेच म्हणायचे आहे. त्यांनी श्रीलंके संदर्भातही असेच केले.
ते म्हणाले, 'मी काल पाहिलं की दुसऱ्या महायुद्धात नाझींशी संबंधित असलेल्या व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी ते गेले होते. अशा परिस्थितीत, हे सर्व संशयास्पद आहे आणि आम्ही यापूर्वीही याचा सामना केला आहे.
जून महिन्यात कॅनडातील सरे शहरात दहशतवादी निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आणि खलिस्तानीच्या मृत्यूचा भारताशी संबंध जोडला. निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असंही ते म्हणाले.
कॅनडातील एजन्सी भारताच्या संभाव्य भूमिकेची चौकशी करत असल्याची माहिती ट्रुडो यांनी दिली होती. तपासात त्यांनी भारताकडे सहकार्यही मागितले होते.
भारताने ट्रुडोचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि कॅनडावर अतिरेक्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला. कॅनडातील भारतीय राजनयिकाची हकालपट्टी केल्यानंतर भारतानेही प्रत्युत्तर देत कॅनडाच्या वरिष्ठ मुत्सद्याची हकालपट्टी केली. नंतर भारतानेही कॅनडात व्हिसा सेवांवर बंदी घातली.