पत्नीला कोरोनाची लागण, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना 14 दिवसांसाठी राहावे लागणार दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:48 AM2020-03-13T10:48:18+5:302020-03-13T12:31:22+5:30
पंतप्रधान कार्यालयाने एक पत्रक जारी करत सोफी ग्रेगोइरे-ट्रूडो यांची गुरुवारी करण्यात आलेली COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे.
ओटावा -कॅनडाचेपंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांची कोरोनाव्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ट्रूडो यांच्या कार्यालयाने गुरुवारी रात्री उशिरा यासंदर्भात माहिती दिली.
पंतप्रधान कार्यालयाने एक पत्रक जारी करत सोफी ग्रेगोइरे-ट्रूडो यांची गुरुवारी करण्यात आलेली COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे.
सोफी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्यानुसार, काही काळासाठी वेगळे ठेवण्यात आले आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. याच बरोबरच त्या सावधगिरीही बाळगत आहेत.
पंतप्रधानांची प्रकृती चांगली असून त्यांच्या शरिरात कोरोना व्हायरसची कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. सावधगिरी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ते पत्नीपासून 14 दिवसांसाठी वेगळे राहतील. मात्र त्यांचे परिक्षण केले जाणार नाही. एवढेच नाही, तर पंतप्रधान आपली कर्तव्ये नियमितपणे पार पाडतील. उद्या कॅनडाच्या जनतेला संबोधित करतील.
स्पेनच्या मंत्री इरेन मोंटेरो यांनाही कोरोनाची लागण -
स्पेनच्या मंत्री इरेन मोंटेरो यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सरकारच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले होते, की इक्वॅलिटी मिनिस्टर मोंटेरो यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मोंटेरो यांना त्यांचा एक सहकारी, उपपंतप्रधान कार्मेन काल्वो आणि पॉडेमस पक्षाचे नेते पॅबलो इग्लेसियास यांच्यासह क्वारँटाइन येथे ठेवण्यात आले आहे. यानंतर सर्व मंत्र्यांना कोरोना व्हायरसची तपासणी करण्याच्या सूचना देण्याता आल्या आहेत. आतापर्यंत देशभरात 2 हजार 200 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली असून 55 जणांचा मृत्यू झाला आहे.