वॉशिंग्टन : रोजचीच धावपळ, बदललेली जीवनशैली यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पुरत्या बदलून गेल्या आहेत. पॅक फूड, बाटलीबंद शीतपेये तसेच प्रोसेस्ड फूड यांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु असे खाद्यपदार्थ खाणे म्हणजे अकाली मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे, असे अभ्यासातून पुढे आले आहे. यामुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका ९ टक्के वाढतो.
अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत गेली ३४ वर्षे अभ्यास केला आहे. या काळात त्यांनी तब्बल १,१४,००० वरिष्ठ नागरिकांचे खाणेपिणे आणि आरोग्यस्थितीचा अभ्यास केला. हा अहवाल बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात सहभागींपैकी १ लाख जणांनी डबाबंद पदार्थांचे सेवन केले होते, असे अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
या पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सर, मानसिक आरोग्यासंबंधीचे विकार, टाईप टू डायबेटीज आदीसोंबत अकाली मृत्यू धोका उद्भवतो, असे म्हटले आहे. नागरिकांना हे पदार्थ खाणे टाळून फळे, भाज्या, कडधान्ये आदींचे सेवन मोठ्या प्रमाणात करावे असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. या अभ्यासात ४८,१९३ मृत्यूमागच्या नेमक्या कारणांचे विश्लेषण केले आहे.
सोडियम ठरते घातक
दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रोसेस्ड फूडमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने मिसळावी लागतात. ही रसायने मृत्यूसाठी कारणीभूत ठरतात. या पदार्थांमध्ये वापरले जाणारे सोडियम तसेच साखर यांचा आरोग्यावर विपरित परणाम होत असतो.