Cannes 2022: यूक्रेनमधील अत्याचाराविरोधात महिलेचं नग्न होऊ निदर्शन, म्हणाली - स्टॉप रेपिंग अस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 02:04 PM2022-05-21T14:04:17+5:302022-05-21T14:10:28+5:30
Cannes 2022 : हे करणाऱ्या महिलेच्या शरीरावर यूक्रेनचा झेंड्याच्या बाजूला 'स्टॉप रेपिंग अस' असा मेसेज लिहिला होता. त्यासोबतच महिलेच्या पायावर लाल रंगही लावला होता.
कान फिल्म फेस्टिवलमध्ये (Cannes 2022) रेड कार्पेटवर शुक्रवारी एक धक्कादायक घटना समोर आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्यक्रमादरम्यान एका महिलेने यूक्रेनमध्ये (Woman strips off her clothes) होत असलेल्या रेप केसेस विरोधात संदेश देण्यासाठी आपले कपडे काढले होते. जॉर्ज मिलरचा सिनेमा 'थ्री थाउजंड इअर्स ऑफ लॉन्गिंग' च्या प्रीमिअर दरम्यान झालेल्या या घटनेमुळे तिथे उपस्थित सगळेच हैराण झाले होते.
हे करणाऱ्या महिलेच्या शरीरावर यूक्रेनचा झेंड्याच्या बाजूला 'स्टॉप रेपिंग अस' असा मेसेज लिहिला होता. त्यासोबतच महिलेच्या पायावर लाल रंगही लावला होता. यूक्रेनमध्ये (Ukraine) महिलांवर होत असलेल्या रेपचा निषेध करण्यासाठी महिलेने या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मचा वापर करत ' आमच्यावर बलात्कार करू नका' अशी घोषणाही दिली.
घटनेनंतर लगेच कान फिल्म फेस्टिव्हलचे गार्ड सतर्क झाले आणि त्यांनी त्यांचे कोट काढत महिलेचं शरीर झाकलं. अशाप्रकारे यूक्रेनच्या संकटावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर असं निदर्शन करण्यात आलं. याआधी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी कान २०२२ च्या सुरूवातीला एक संदेश दिला होता. जेलेंस्की म्हणाले होते की, 'आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी एका नव्या चार्ली चॅपलिनची गरज आहे की, आज सिनेमा गप्प नाहीये'.
तसेच यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देशात होत असलेल्या रेपच्या मुद्द्यावरही भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, गेल्या महिन्यात रशियन सैनिकांच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये बलात्कारांच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत.