इस्लामाबाद, दि. 5 - उत्तर कोरियाचं अणुबॉम्ब तंत्रज्ञान पाकिस्तानपेक्षा खूप चांगलं असल्याचं अणुबॉम्ब संशोधक डॉ अब्दुल कादिर खान यांनी मान्य केलं आहे. विशेष म्हणजे डॉ अब्दुल कादिर खान यांना पाकिस्तानमध्ये फादर ऑफ न्यूक्लिअर प्रोग्राम म्हणून ओळखलं जातं, आणि त्यांनीच उत्तर कोरियाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हटलं आहे. एका अर्थी उत्तर कोरिया पाकिस्तानच्या बापाचा बाप असल्याचंच त्यांनी मान्य करुन टाकलं आहे. उत्तर कोरियाला पाकिस्तानकडून मदत करण्यात आल्याचं वृत्तही त्यांनी यावेळी फेटाळून लावलं.
डॉ अब्दुल कादिर खान यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. 'उत्तर कोरिया आत्मनिर्भर न्यूक्लिअर पावर असून, त्यांच्याकडे उच्चशिक्षित संशोधक आहेत', असं त्यांनी यावेळी सांगितलं.
डॉ अब्दुल कादिर खान यांनी दोनवेळा उत्तर कोरियाला भेट दिली आहे. मिसाईल प्रोग्रामच्या निमित्ताने त्यांना ही संधी मिळाली होती. 'त्यांचे संशोधक अत्यंत सक्षम आहेत. त्यांच्यातील अनेकांनी रशियामध्ये आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे', असं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी, रशिया आणि चीनचा अमेरिकाविरोध पाहता ते कधीच उत्तर कोरियाला आपल्यापासून वेगळं होऊ देणार नाहीत असं सांगितलं आहे.
उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर प्रोगाममध्ये पाकिस्तानची काय भूमिका आहे ? असा प्रश्न विचारला असता डॉ अब्दुल कादिर खान यांनी उत्तर दिलं की, 'या प्रश्नाला काही अर्थ नाही. त्यांच्याकडे आपल्यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान आहे. आपल्याकडे अजूनही जूनं आणि परंपरागत तंत्रज्ञान आहे'.
'हायड्रोजन बॉम्ब हे अणुबॉम्बपेक्षाही जास्त शक्तिशाली असतात. अणुबॉम्ब दीड ते दोन किमी अंतरावरील परिसर नष्ट करु शकतात, पण हायड्रोजन बॉम्ब संपुर्ण शहर उद्ध्वस्त करु शकतो', अशी माहिती डॉ अब्दुल कादिर खान यांनी उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीवर बोलताना दिली.
हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय?हायड़्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अनेक पटीने संहारक असतो. अणुबॉम्बमध्ये स्फोट घडवण्यासाठी अणुविखंडनाची प्रक्रिया वापरली जाते. तर हायड्रोजन बॉम्बमध्ये केंद्रकीय संमिलन (फ्युजन) प्रक्रियेद्वारे स्फोट घडवून आणला जातो. संमिलनाची प्रक्रिया अणुविखंडनापेक्षा किचकट असते. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्बमध्ये संमिलन घडवण्यासाठी अणुस्फोट केला जातो. त्यामुळे हा स्फोट झाल्यानंतर हायड्रोजनची समस्थानिके असलेल्या ड्युटेरियम, ट्रिटीयम यांच्यात शृंखला अभिक्रिया होऊन मोठ्य़ा प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. शितयुद्धाच्या काळात 1952 साली अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण केले होते. तर 1961 साली रशियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते. मात्र भयंकर संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बचा अद्याप युद्धात वापर करण्यात आलेला नाही.