मॉस्को : रशियाचे युरी गागारीन हे अंतराळात पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. त्यांच्या या अख्ख्यायिका ठरलेल्या उड्डाणाला सोमवारी ६० वर्षे झाली. रशियाने हा हीरक महोत्सव जोरदारपणे साजरा केला. रशियाच्या दशलक्षावधी नागरिकांसाठी युरी गागारीन हे मोठ्या अभिमानाचा विषय आहेत. त्यांचे २७ मार्च १९६८ रोजी विमान अपघातात निधन झाले. रशियाचा अंतराळ उद्योग गेल्या काही वर्षांत बराच संघर्ष करीत आहे. अनेक दुर्घटनांनाही त्याला ताेंड द्यावे लागले तरी १२ एप्रिल १९६१ रोजी अंतराळात पहिला मानव पाठविण्याची मोठी भव्य कामगिरी त्याच्या खाती जमा आहे. देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सोमवारी व्होल्गा नदीच्या काठावर असलेल्या दक्षिणेकडील एंजेल्स शहरात गेले. या शहरात गागारीन यानातून उतरले होते त्या जागी या ऐतिहासिक उड्डाणाचे स्मारक उभारण्यात आले आहे. पुतीन यांच्यासोबत व्हॅलेंटिना टेरेश्कोवा होत्या.
६० वा वर्धापन दिनयुरी गागारीन यांनी ज्या दिवशी अवकाशात उड्डाण केले तो दिवस रशियात अंतराळ दिन म्हणून साजरा केला जात. यावर्षी तर ६० वा वर्धापन दिन असून, अधिकाऱ्यांनी दूरचित्रवाणीवर २४ तास त्याच्या बातम्या, लेसर प्रोजेक्शन आणि गागारीन यांची छायाचित्रे दिसतील अशी व्यवस्था केली आहे. गागारीन यांचे ते अख्ख्यायिका ठरलेले उड्डाण १०८ मिनिटांचे होते.
रशियाचे अंतराळवीर युरी गागारीन यांचा नवी दिल्लीत १९६१ मध्ये लाल किल्ल्यावर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राम चरण अग्रवाल उपस्थित होते.