सीरियात रासायनिक हल्ला; स्त्रिया व मुलांसह ८० ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:04 AM2018-04-09T02:04:43+5:302018-04-09T02:04:43+5:30
बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियातील डोमा या शहरात शनिवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात ८० नागरिक मरण पावले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
दमास्कस : बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियातील डोमा या शहरात शनिवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात ८० नागरिक मरण पावले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. हल्ल्यासाठी सायनाइडपेक्षा वीसपट विषारी असलेले सरिन रसायन वापरण्यात आले.
हल्ल्यामुळे बाधित झालेल्या लोकांची छायाचित्रे ‘व्हाईट हॅल्मेट रीलिफ आॅर्गनायझेशन’ने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली.
मृतांमध्ये महिला व मुलांचे प्रमाण अधिक आहे. ब्रिटनने म्हटले की, सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी कौर्याची परिसीमा गाठली आहे. निरपराध लोकांचा बळी घेतला आहे. हल्ल्याची तत्काळ चौकशी करण्यात यावी. यापूर्वीही अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. (वृत्तसंस्था)
>सरिनने काही क्षणात मृत्यू : शनिवारच्या हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेल्या सरिनमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. हृदय व श्वसनसंस्थेतील स्नायू आखडले जातात. काही क्षणांतच मृत्यू ओढावतो.
उत्तर कोरियाकडून मदत? या आधीही गुटा भागामध्ये २०१३ साली रासायनिक हल्ला करण्यात आला होता. त्या वेळी शेकडो जणांचा बळी
गेला होता. सीरिया सरकारला रासायनिक अस्त्रे बनविण्यासाठी उत्तर
कोरिया मदत करत असावा, असा पाश्चिमात्य देशांचा कयास आहे.
सीरिया सरकारची रशिया व इराणने सतत पाठराखण केली आहे.