ओबामांनी लहानपणी ऐकल्या रामायण, महाभारतातील गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 05:01 AM2020-11-19T05:01:51+5:302020-11-19T05:05:04+5:30
पुस्तकात जागविल्या आठवणी; भारताविषयी विलक्षण ओढ
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या लहानपणी इंडोनेशियात राहात असताना, नेहमी रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकत असत.
या कारणामुळे ओबामा यांना भारताबद्दल विशेष आस्था आहे. ओबामा यांनी आपल्या जीवनातील आठवणींना ‘ए प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकात उजाळा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर २०१० साली मी भारताचा दौरा केला. त्याआधी कधीही त्या देशात जाणे झाले नव्हते. मात्र तरीही माझ्या मनात भारताविषयी ममत्व होते. त्यामुळेच पौर्वात्य देशांतील धार्मिक गोष्टींबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची मला इच्छा झाली. भारतामध्ये जगातील एक षष्ठांश लोकसंख्या राहाते असेही ओबामा यांनी म्हटले आहे. ‘ए प्रॉमिस्ड लँड' हे आठवणीपर पुस्तक दोन खंडात प्रसिद्ध होणार आहे. त्यातील पहिला खंड मंगळवारी विक्रीसाठी उपलब्ध झाला. या पुस्तकात बराक ओबामा यांनी म्हटले आहे की, भारतामध्ये राजकीय पक्षांत संघर्ष आहे. त्या देशात काही ठिकाणी फुटीरतावादी चळवळी सुरू आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली. हे सारे असूनही भारताने अनेक क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. (वृत्तसंस्था)
दही लावायला, खिमा बनवायला शिकलो
बराक ओबामा यांनी म्हटले आहे की, कॉलेजमध्ये माझ्या मित्रपरिवारात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी होते. दही कसे लावायचे, खिमा कसा बनवायचा हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे. या मित्रांमुळेच मी बॉलिवूडचे चित्रपट पाहू लागलो.