चीनला समुद्रात घेराव घालतेय अमेरिका, भारत अन् जपानसोबत युद्धाभ्यास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 06:03 PM2020-07-22T18:03:26+5:302020-07-22T18:03:53+5:30
भारतानंतर आता अमेरिकेनं दक्षिण चीनच्या समुद्रातील वादग्रस्त भागात जवळपास 4000 किमीपर्यंत फिलिपिन्स समुद्रात जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलासह युद्धाभ्यास सुरु केला आहे
अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ट्रम्प सरकारने बुधवारी चीनला ह्युस्टनमधील त्यांचे वाणिज्य दूतावास 72 तासांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे चीनी नौदलाला समुद्रातही घेरण्याचा प्रयत्न अमेरिकन नौदल करत आहे. नुकतंच, भारतीय नौदलाने अमेरिकन नौदलासह अंदमान-निकोबार बेटावरील किनाऱ्याजवळ सैन्य सराव केला आहे. या संयुक्त युद्धाभ्यासात अमेरिकन नौदलाने जगातील सर्वात मोठी युद्धनौका असलेल्या युएसएस निमित्जचा वापर केला होता.
भारतानंतर आता अमेरिकेनं दक्षिण चीनच्या समुद्रातील वादग्रस्त भागात जवळपास 4000 किमीपर्यंत फिलिपिन्स समुद्रात जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलासह युद्धाभ्यास सुरु केला आहे. या युद्धाभ्यासासंदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये चीनच्या नावाचा उल्लेखही नाही. दक्षिण चीनी समुद्राच्या अधिकाधित भागात चीन आपला दावा करत आहे. माहितीनुसार, तीन देशांच्या या युद्धाभ्यासात 12 फायटर जेट आणि 9 युद्धनौकांचा वापर करण्यात आला आहे. या अभ्यासात अमेरिकेने यूएसएस रोनाल्ड रीगनलाही सहभागी करुन घेतले आहे. अमेरिका चीनवर समुद्रमार्गेही सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
पूर्व लडाख आणि दक्षिण चीन सागरात चीनी सैन्य सातत्याने आक्रमक रुप धारण करत असल्याचं दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामूहिक, संयुक्तिक युद्धअभ्यासाच महत्व अतिशय वाढलं आहे. तर, भारतीय नौदलाने हिंद महासागरातील त्या क्षेत्रात गस्त वाढविण्यास सुरुवात केली आहे, जिथं चीनी सैन्यासोबत सातत्याने सामना होतो. महासागरातील चीन नौदलाचा वाढता प्रभाव पाहता, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि फ्रान्सच्या नौदलाने हिंद व प्रशांत महासागरात आपली मैत्री घट्ट केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, ट्रम्प सरकारने बुधवारी चीनला ह्युस्टनमधील त्यांचे वाणिज्य दूतावास 72 तासांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ह्युस्टन पोलीसदेखील वकिलातीबाहेर जातात, पण मुत्सद्दी हक्कांमुळे ते आतमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. पोलिसांनी सांगितले की, दूतावासातून धूर निघत असल्याचं पाहून लोकांनी त्यांना माहिती दिली, त्यानंतर ते तेथे आले, पण चिनी अधिका-यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. शीतयुद्धानंतर प्रथमच अमेरिकेने पहिल्यांदाच कोणत्या तरी देशाला दूतावास बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ह्युस्टनचे वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे.