अमेरिकेनं भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीनचा जळफळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 05:06 PM2017-10-20T17:06:13+5:302017-10-20T17:08:43+5:30

अमेरिकेनं चीनच्या वन बेल्ट वन रोड(ओबीओआर)या प्रकल्पावर टीका करत भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीननं आगपाखड केली आहे. अमेरिका दुजाभाव करत असल्याचं म्हणत चीननं अमेरिकेवरच निशाणा साधला आहे.

China blames America for its exasperation | अमेरिकेनं भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीनचा जळफळाट

अमेरिकेनं भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीनचा जळफळाट

Next

वॉशिंग्टन- अमेरिकेनं चीनच्या वन बेल्ट वन रोड(ओबीओआर)या प्रकल्पावर टीका करत भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीननं आगपाखड केली आहे. अमेरिका दुजाभाव करत असल्याचं म्हणत चीननं अमेरिकेवरच निशाणा साधला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिऊ कांग म्हणाले, अमेरिकेनं पक्षपाती भूमिका सोडून इतर देशांना समान वागणूक दिली पाहिजे. जेणेकरून चीन-अमेरिकेच्या संबंधात सकारात्मकता येईल.

तत्पूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी भारत दौ-यावर असताना चीनच्या दक्षिण चीन समुद्रातील दाव्याला फटकारलं होतं. तसेच भारत हा आशियातला महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. अनिश्चितता व चिंतेच्या या काळात जागतिक पातळीवर अमेरिकेचा भारत हा विश्वासार्ह मित्र आहे. तसेच चीनच्या विरोधात अमेरिका भारताला समर्थन देणार असल्याचंही टिलरसन यांनी स्पष्ट केलं होतं. चीनचा व्यवहार व त्यांची कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांना आव्हान देत आहे. भारतासोबतच प्रगती करत असलेल्या चीननं जबाबदारीनं भूमिका निभावली पाहिजे. भारत इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करतो, असंही टिलरसन म्हणाले आहेत. भारत हा महत्त्वाचा भागीदार असल्याचं अमेरिकेनं सांगितल्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनच्या संतापाला पारावार उरला नव्हता. अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असं म्हणत अमेरिकेच्या या कृतीला चीननं विरोध दर्शवला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्र नाशक युद्धनौका चीन दावा सांगत असलेल्या द्विपाच्या जवळून गेली होती. या भागावरून चीनचा शेजारील देशांशी वाद सुरू आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, चीननं युद्धनौकेची ओळख पटवण्यासाठी स्वतःचं सैन्य जहाज तिथे पाठवलं आणि अमेरिकेच्या युद्धनौकेला तिथून जाण्याचा इशारा दिला होता. अमेरिकेच्या युद्धनौकेनं चीनचा कायदा व संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं आहे. तसेच चीनचं सार्वभौमत्व व सुरक्षेच्या हितांचंही उल्लंघन केलं आहे. चीननं कडक शब्दात याचा निषेध नोंदवल्याचंही चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेच्या नौदलानं चौथ्यांदा केलेलं फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन ऑपरेशन(FNOP) आहे.

Web Title: China blames America for its exasperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.