बीजिंग: चीननं तीन ठिकाणी मिसाईल सायलो फील्ड (बंकर किंवा भांडार) उभारले असल्याचा संशय आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमधील तज्ज्ञांनी झोप उडाली आहे. चीननं उभारलेले बंकर युमेन, हामी आणि ऑर्दोस परिसरात आहेत. अमेरिकेन थिंक टँक फेडरेशन ऑफ अमेरिकन साईंटिस्टनं (एफएएस) याबद्दलचा खुलासा केला आहे.
प्लॅनेट लॅब्स आणि मॅक्सार टेक्नॉलॉजीच्या मदतीनं उपलब्ध झालेल्या छायाचित्रांचा हवाल्यानं फेडरेशन ऑफ अमेरिकन साईंटिस्टनं केलेल्या दाव्यानं संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. चीननं तीन सायलो उभारल्याचा दावा छायाचित्रांच्या आधारे करण्यात आला आहे. चीन अशाच प्रकारे तब्बल ३०० सायलो उभारत असल्याचा दावा फेडरेशन ऑफ अमेरिकन साईंटिस्टनं केला आहे. यासाठी अतिशय वेगानं काम सुरू असून हा कार्यक्रम चिनी सैन्याच्या आधुनिकीकरणाचा भाग असल्याचा दावा एफएएसनं केला आहे.
चीननं सुरू केलेलं अभियान अभूतपूर्व असल्याचं एफएएसचा अहवाल तयार करणाऱ्या मॅट कोर्डा आणि एम क्रिस्टेंसन यांनी सांगितलं. 'किमान अण्वस्त्र तयार करण्याच्या धोरणावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मिसाईल सायलो फील्ड सुरू होण्यास अद्याप बराच कालावधी आहे. मात्र भविष्याचा विचार केल्यास हा मोठा धोका आहे. चीन या सायलोंचा वापर कसा करेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सायलोंची उभारणी चिंताजनक आहे,' असं कोर्डा आणि क्रिस्टेंसन म्हणाले.
चीनकडून ज्या वेगानं सायलोंची उभारणी सुरू आहे, तो पाहता जगात अण्वस्त्र स्पर्धा वाढू शकते, अशी भीती क्रिस्टेंसन यांनी व्यक्त केली. चीननं पहिलं सायलो फील्ड तयार केल्याची माहिती जूनमध्ये समोर आली होती. त्यानंतर जुलैमध्ये दुसरा अहवाल आला आणि दुसऱ्या सायलोची माहिती पुढे आली. शीतयुद्ध सुरू असताना रशिया आणि अमेरिका यांच्याकडून सायलो फील्डची निर्मिती करण्यात आली होती. मात्र चीननं हाती घेतलेलं मिशन त्यापेक्षा मोठं आहे.