संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आज काश्मीर प्रश्नी बंद खोलीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 07:52 AM2019-08-16T07:52:26+5:302019-08-16T07:53:32+5:30
काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न
न्यूयॉर्क: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयावर आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चर्चा होणार आहे. चीनच्या मागणीमुळे बंद खोलीत ही चर्चा होईल, असं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेनं दिलं आहे. यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पोलंड यांनी आज सकाळी १० ची वेळ दिली आहे. याशिवाय हाँगकाँगमध्ये गेल्या १० दिवसांपासून लोकशाहीच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दादेखील संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला जाणार आहे. हाँगकाँगच्या विषयावरुन संयुक्त राष्ट्रानं महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षा परिषदेत काश्मीरवर होऊ घातलेली चर्चा दुर्मिळ घटना मानली जात आहे. याआधी १९६५ मध्ये सुरक्षा परिषदेच्या पूर्ण बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली होती. आज होणारी बैठक पूर्ण स्वरुपाची असणार नाही. आजची बैठक बंद खोलीत होईल. काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. तर या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप मान्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारतानं आधीपासूनच घेतली आहे. काश्मीरचा मुद्दा अंतर्गत स्वरुपाचा असल्यानं त्यात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही, यावर भारत ठाम आहे. शिमला करारानुसार काश्मीर प्रश्न पाकिस्तानसोबत संवादाच्या माध्यमातून सोडवला जाऊ शकतो किंवा दोन्ही देशांची संमती असल्यास तिसऱ्या देशाची मदत घेतली जाऊ शकते.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा भारताकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यासाठी पाकिस्ताननं हरतऱ्हेचे प्रयत्न केले. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानं आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानं दहशतवादाचा अजेंडा राबवणं कठीण जाईल असं पाकिस्तानला वाटतं. त्यामुळेच चीनच्या मदतीनं काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू होते. अखेर चीननं याबद्दल बैठक घेण्याची मागणी केली. त्यामुळे आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीर प्रश्नावर बंद खोलीत चर्चा होईल.