चीननं घेतला या वर्षातला सर्वात मोठा निर्णय! भारतच नव्हे, तर संपूर्ण जगावर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 06:11 PM2021-07-09T18:11:34+5:302021-07-09T18:12:10+5:30
अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी चीननं मोठं पाऊल उचलंत रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशोमध्ये (reserve requirement ratio)अर्ध्या टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी चीननं मोठं पाऊल उचलंत रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशोमध्ये (reserve requirement ratio)अर्ध्या टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चीनच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये रोखरक्कम वाढणार आहे. त्यामुळे बँका कंपन्या किंवा ग्राहकांना जास्त कर्ज देऊ शकणार आहेत. यातून कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकेल. कंपन्यांना आपलं आर्थिक उप्तन्न वाढविण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मतानुसार चीनच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यास याचा केवळ चीनलाच नव्हे, भारतासोबतच संपूर्ण जगाला याचा फायदा होणार आहे. चीनच्या निर्णयामुळे बाजारात १ लाख कोटी यूआन इतका पैसा येईल आणि सोमवारी भारतीय शेअर बाजारात याचे परिणाम पाहायला मिळू शकतात. देशातील धातू उप्तादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
भारतातील सीआरआर प्रमाणेच चीनमध्ये रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशोची व्यवस्था असते. चीनची सर्वोच्च बँक असलेल्या 'सेंट्रल पीपल्स बँक ऑफ चायना'नं यात घट करुन बँकिंग व्यवस्थेत रोखरक्कम वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. चीननं रिझर्व्ह रेशोमध्ये ०.५ टक्क्यांची कपात केली आहे. नवे दर १५ जुलैपासून लागू होणार आहेत. प्रसार माध्यमांमधील माहितीनुसार चीनच्या या निर्णयामुळे बाजारात १ लाख कोटी यूआन इतकी रक्कम येणार आहे. याचा परिणाम आपल्याला शेअर बाजाराता पाहायला मिळू शकतो.
भारतावर काय परिणाम होणार?
चीन संपूर्ण जगात धातूचा सर्वात मोठा ग्राहक आहे. अशावेळी व्याजदरात कपात झाल्यानं धातूच्या दराला मोठा आधार मिळेल. यामुळे जगभरातील शेअर बाजाराला मोठी चालना मिळेल. अमेरिकी डॉलरवर दबाव वाढल्यानं भारतीय रुपयाला देखील आधार मिळेल. स्वस्त दरात चीनमधील कंपन्यांना कर्ज उपलब्ध होऊ शकेल. यामुळे उत्पादनात मोठी वाढ होईल आणि तांबं, झिंक, शिस्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढेल. अशावेळी भारतीय कंपन्या याचा मोठा फायदा घेऊ शकतात. दरम्यान, चीन आणि भारताची मॉनिटरी पॉलिसी जवळपास एकसारखीच आहे. चीननं ज्या ज्या वेळी व्याज दरात कपात केलीय. त्यानंतर भारतातही व्याज दरात कपातीचा निर्णय घेतला जातो. सध्या भारतात व्याज दरात कपातीची शक्यता खूपच कमी आहे. कारण भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत.
अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार यांचं एकमेकांशी नातं आहे. त्यामुळेच काही देशांच्या अर्थव्यवस्थेत तेजी मिळाल्याचं दिसल्यानंतर शेअर बाजारातंही सुगीचे दिवस आल्याचं पाहायला मिळतं.