मुलांच्या चुकीची शिक्षा पालकांना मिळणार! चीनमध्ये आणला जातोय नवा कायदा, नेमकं प्रकरण काय? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 02:52 PM2021-10-19T14:52:00+5:302021-10-19T14:52:41+5:30
चीनमध्ये (China) आता लहान मुलांच्या चुकीची शिक्षा त्यांच्या पालकांना भोगावी लागणार आहे. यासाठी चीनी संसदेत (China Parliament) तसा कायदाच संमत करण्याची तयारी केली जात आहे.
चीनमध्ये (China) आता लहान मुलांच्या चुकीची शिक्षा त्यांच्या पालकांना भोगावी लागणार आहे. यासाठी चीनी संसदेत (China Parliament) तसा कायदाच संमत करण्याची तयारी केली जात आहे. या नव्या कायद्यांतर्गत मुलांनी केलेल्या चुकीची शिक्षा पालकांना म्हणजेत मुलांच्या आई-वडिलांनी भोगावी लागणार आहे. 'फॅमिली एज्युकेशन प्रोमोशन लॉ'चा (Family education promotion law) मसुदा तयार केला जात असून यात आई-वडिलांच्या संस्कारात वाढत असलेल्या मुलांकडून कोणत्याही प्रकारचा अपराध घडला तर त्याची जबाबदारी पालकांची असणार आहे. यासाठी कौटुंबिक शिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये पालकांना सहभागी व्हावं लागणार आहे.
नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (NPC) कायदे मंडळाचे प्रवक्ते जांग तिवैक यांच्या म्हणण्यानुसार, "लहान मुलांच्या चुकीच्या वागणुकीमागे अनेक कारणं असतात. यात कौटुंबिक संस्कारांचा अभाव हेही एक महत्त्वाचं कारण ठरतं. पाल्यांनी आपल्या मुलांच्या आरामासाठी, खेळण्याची आणि व्यायामाची वेळ निश्चित करुन द्यायला हवी. मुलांवर चांगले संस्कार करणं ही पालकांची जबाबदारी आहे"
नेमकं नव्या कायद्यात आहे तरी काय?
चीनच्या या अनोख्या कायद्याच्या मसुद्यानुसार लहान मुलांनी एखादा अपराध केल्यास त्याची शिक्षा मुलाच्या आई-वडिलांना भोगावी लागणार आहे. चीनमध्ये अल्पवयीन आरोपींच्या वयाची अट १६ वर्ष इतकी आहे. जर कौटुंबिक नियमांचं पालन केलं जात नसेल तर एकदा समज दिली जाईल. केल्या गेलेल्या गुन्ह्याचं स्वरुप लक्षात घेता १ हजार युआन (जवळपास ११ हजार रुपये) दंड आकारला जाईल किंवा ५ दिवस तुरुंगवास ठोठावण्यात येईल. संपूर्ण देशात पालन-पोषण कौशल्य, नैतिकता आणि समाजवाद मूल्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी अशा स्वरुपाचा कायदा अस्तित्वात आणला जात असल्याचं चीन सरकारचं म्हणणं आहे.