नवी दिल्ली, दि. २२ - गेल्या काही काळापासून पाकिस्तानची सातत्याने पाठराखण करणाऱ्या चीनने काश्मिरप्रश्नी पाकिस्तानला धक्का दिला आहे. काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे सोडवसा गेला पाहिजे असा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे. तसेच या प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची इस्लामिक सहकार्य संघटनांनी केलेली मागणी फेटाळून लावली आहे. महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोडबाबत चीन चिंतीत आहे. त्यामुळे त्याच्या धोरणात बदल झाल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान, काल भारताने काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला चांगलेच खडसावले होते. राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला आहे. याआधी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी असाही कांगावा केला आहे की, काश्मीर लोकांचा संघर्ष भारताकडून मोडीत काढण्यात येत आहे. शिवाय, भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी कारवायाही चालवण्यात येतात, असा आरोपही यावेळी अब्बासी यांनी केला.भारताकडून राजदूत एनम गंभीर यांनी मोर्चा सांभाळला. त्या बोलल्या आहेत की, 'टेररिस्तान बनलेल्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद फैलावत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचा प्रभाव पडत आहे. पाकिस्तानची पवित्र जमीन मिळवण्याच्या नादात पाकिस्तान दहशतवादाची पवित्र जमीन झाली आहे. आपल्या छोट्याश्या इतिहासात पाकिस्तान दहशतवादासाठी पर्याय ठरला आहे'. यापुढे बोलताना एनम गंभीर यांना पाकिस्तानला सुनावलं की, 'ज्या देशाने ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमरसारख्या दहशतवाद्यांना आश्रय दिला, तो देश स्वत:ला पीडित म्हणवण्याचं धाडस करत आहे'.काश्मीर मुद्यावर बोलतानाही एनम गंभीर यांनी पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. 'जम्मू काश्मीर नेहमी भारताचा अविभाज्य घटक असेल हे पाकिस्तानने लक्षात ठेवलं पाहिजे. पाकिस्तानने दहशतवादाला कितीही खतपाणी घातलं, तरी भारताच्या अखंडतेला धक्का लावण्यात त्यांना यश मिळणार नाही', असं एनम गंभीर बोलल्या आहेत.पाकिस्ताच्या जमिनीवर दहशतवाद्यांना मिळणा-या आश्रयावर बोलताना एनम गंभीर बोलल्या की, 'ज्या पाकिस्तानात दहशतवादी बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरताना दिसतात, त्यांना आम्ही भारताच्या मानवाधिकारावर सल्ला देताना आम्ही पाहिलं आहे'. पुढे बोलताना एनम गंभीर यांनी सांगितलं की, 'देशाला लोकशाही आणि मानवाधिकारावर अशा देशाकडून शिकवण घेण्याची गरज नाही, ज्याला अपयशी देश म्हणून ओळखलं जातं'.कोण आहेत एनम गंभीर ?एनम यांनी ट्विटरवर आपण भारतीय राजदूत असून दिल्लीमध्ये राहत असल्याची माहिती दिली आहे. फेसबूकवर त्यांनी आपण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ जिनीवामधून शिक्षण पुर्ण केलं आहे. सध्या त्या न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या 2005 बॅचमधील आयएफएसच्या (इंडियन फॉरेन सर्व्हिसेस) अधिकारी आहेत.