Mission Shakti: भारताच्या 'मिशन शक्ती'वर चीन म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 07:52 PM2019-03-27T19:52:44+5:302019-03-27T19:56:31+5:30
भारतानं क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती मिळवल्यानंतर चीनकडूनही प्रतिक्रिया आली आहे.
बीजिंग- भारतानं क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती मिळवल्यानंतर चीनकडूनही प्रतिक्रिया आली आहे. सर्वच देशांनी अवकाशाच्या कक्षेत शांती प्रस्थापित करावी, अशी आशा चीननं व्यक्त केली आहे. भारतानंमिशन शक्ती यशस्वी केल्यानंतर पाकिस्ताननं आगपाखड केली आहे, तर चीननं भारताला अवकाशात शांती प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, आम्हाला बातमी समजली. आम्ही आशा करतो की प्रत्येक देश हा अंतरिक्ष कक्षेत शांती प्रस्थापित करण्यावर भर देईल. चीननं 2007मध्ये अशा प्रकारची चाचणी केली होती. त्यावेळीही क्षेपणास्त्रानं चीननं उपग्रह पाडला होता. भारताच्या या यशानंतर पाकिस्तानमध्येही खळबळ उडाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. त्या पत्रकात म्हटलं आहे की, पाकिस्तान हा अंतरिक्षाला मानवतेचा वारसा या दृष्टीनं पाहतो. प्रत्येक देशानं अशा हालचालींपासून दूर राहिलं पाहिजे. जेणेकरून अंतरिक्षाचं सैन्यीकरण होणार नाही.
गेल्या अनेक काळापासून ज्या देशांनी याविरोधात आवाज उठवला आहे, ते पुन्हा एकदा यासंदर्भात आवाज उठवतील, अशी आशा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केली आहे. भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचं नाव कोरलं आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्यानं भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं आहे.
अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं.