भारतातील पेटत्या चितांवरून चीनने उडविली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 06:10 AM2021-05-04T06:10:23+5:302021-05-04T06:11:04+5:30
कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या स्मशानभूमीत जळणाऱ्या सरणावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पक्षाने भारताची खिल्ली उडविली.
बीजिंग : भारताला कोरोना संकटात मदत करण्याचा हात पुढे करून चीन जगासमोर सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, चीनचा पुन्हा एकदा विकृत चेहरा समोर आला आहे.
कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या स्मशानभूमीत जळणाऱ्या सरणावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पक्षाने भारताची खिल्ली उडविली. मात्र, हा प्रकार त्यांच्याच अंगलट आला आणि जगभरात चीनला नाचक्कीला तोंड द्यावे लागले. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतातील कोरोना संकटाची खिल्ली उडविण्यात आली. भारतात चिता जळत आहेत आणि चीन अंतराळात स्पेस स्टेशन तयार करत आहे, असे लिहिण्यात आले होते. चीनची मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबोवर कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पोलिटिकल अँड लीगल अफेअरचे अकाऊंट आहे. यावर हे वादग्रस्त विधान फोटोंसह पोस्ट करण्यात आले होते.