वुहानः 'मुजोरी करणारा शेजारी' अशी ओळख असलेल्या चीनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दणक्यात स्वागत केलंच, पण 'मन की बात' करणाऱ्या मोदींना अनोख्या पद्धतीने आपल्या 'दिल की बात'ही सांगितली. 'तू है वही... दिल ने जिस... अपना कहा...' या बॉलिवूडमधील हिट गाण्याची धून चीनमधील कलाकारांनी खास मोदींसाठी वाजवली, तेव्हा सगळेच चमकले. भारतासोबत बरीच 'डील' करायची असल्यानं चीनने हे 'दिल'वालं गीत त्यांनी सादर केलं असावं, अशी कुजबूज ऐकू येतेय.
डोकलाम वादामुळे भारत-चीन नात्यात कडवटपणा आला आहे. त्याशिवाय, पाकिस्तान-चीन मैत्री आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबाबत चीन घेत असलेली भूमिका, यामुळेही हा शेजारी थोडा धोकादायकच वाटतो. हा तणाव कमी करण्याच्या हेतूने दोन्ही देशांचे प्रमुख नेते - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होतेय. शी जिनपिंग यांचं आमंत्रण स्वीकारून मोदी चीन दौऱ्यावर गेलेत. तिथे दोन दिवसांत त्यांच्या सहा बैठका होणार आहेत. ही भेट अनौपचारिक असल्यानं त्यात काही ठोस करार वगैरे होणार नसले तरी दोन्ही देशांसाठी; त्यातही चीनसाठी मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे. अमेरिकेने चीनच्या वस्तूंच्या आयातीवरील कर वाढवल्यानं चीनचं लक्ष भारताच्या बाजारपेठेकडे लागलंय. त्यामुळे भारताला खूष करण्याची मोर्चेबांधणी चीननं केलेली दिसते.
चीनचं हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वुहान शहरातच मोदी-जिनपिंग यांची भेटताहेत. तलावांचं शहर अशीही वुहानची ओळख आहे. तिथल्या ईस्ट लेकमध्ये मोदी-जिनपिंग यांनी आज नौकाविहाराचा आनंद लुटला. त्यानंतर, भारतात चहा कसा केला जातो, हे सांगत मोदींनी चिनी चहाचे घोट घेत 'चाय पे चर्चा'ही केली.