चीनचे आव्हान; क्वाड देशांनी केले विचारमंथन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:30 AM2021-03-14T04:30:34+5:302021-03-14T04:31:38+5:30
दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात चीनची आक्रमक भूमिका, उत्तर कोरिया अण्वस्त्र मुद्दा आणि म्यानमारमधील सत्तांतर व हिंसाचार याबाबत या नेत्यांनी चर्चा केली.
वॉशिंग्टन : अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या नेत्यांनी क्वाड देशांच्या पहिल्या बैठकीत चीनच्या आव्हानाबाबत चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की, चीनबाबत कुणालाही भ्रम नाही. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी ही माहिती दिली. (China's challenge; Quad countries brainstormed)
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यातील ऐतिहासिक डिजिटल क्वाड शिखर संमेलनानंतर व्हाइट हाउसमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सुलीवान यांनी सांगितले की, यावर्षी एकत्र शिखर संमेलन घेण्यावर चारही नेते सहमत झाले आहेत.
दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात चीनची आक्रमक भूमिका, उत्तर कोरिया अण्वस्त्र मुद्दा आणि म्यानमारमधील सत्तांतर व हिंसाचार याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. सुलीवान आणि अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकन १८ - १९ मार्च रोजी चीनच्या आपल्या समकक्ष यांग जाइची आणि विदेशमंत्री वांग यी से यांच्याशी अलास्काच्या एंकरेजमध्ये चर्चा करतील.