CoronaVirus: रशियातून 'एक्स्पोर्ट' होतोय कोरोना; आकडेवारीनं वाढवली चीनची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:53 AM2020-04-13T09:53:47+5:302020-04-13T09:57:13+5:30
CoronaVirus: चीनमध्ये कोरोना परतला; रुग्ण संख्येनं सहा आठवड्यांतला उच्चांक गाठला
बीजिंग: चीनमधून संपूर्ण जगात पोहोचलेल्या कोरोनानं अक्षरश: धुमाकूळ घातला असून यामुळे १ लाखाहून अधिक जणांचा बळी गेला आहे. जगभरात पोहोचलेल्या कोरोनावर चीननं नियंत्रण मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनमध्ये काल (रविवारी) १०८ नव्या रुग्णांची नोंद झाली. हा सहा आठवड्यांमधला उच्चांक आहे. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे चीनमधले सापडलेले नवे रुग्ण रशियातून आले आहेत.
चीनमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात अडकलेले चिनी नागरिक आता मायदेशी परतू लागले आहेत. यातील काहींना कोरोनाची बाधा झाल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. काल चीनमध्ये १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याआधी (शनिवारी) ९९ नवे रुग्ण आढळून आले होते. ५ मार्च रोजी चीनमध्ये १४३ कोरोनाबाधित सापडले होते. यानंतर पहिल्यांदाच काल कोरोनाबाधितांची संख्या १०८ वर पोहोचली.
चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजार १६० झाली असून मृतांचा आकडा ३ हजार ३४१ इतका आहे. चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या परदेशांतून येणाऱ्या चिनी नागरिकांमुळे वाढत असल्याची आकडेवारी राष्ट्रीय आरोग्य आयोगानं दिली. काल परदेशातून आलेल्या ९८ जणांना कोरोना झाल्याचं उघड झालं आहे. परवा हाच आकडा ९७ इतका होता, अशी माहिती आयोगानं दिली. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून संसर्ग झाल्यास देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वेगानं फैलाव होण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
चीनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी ५६ जण एकट्या हेलाँगजिआंग प्रांतातले आहेत. हा भाग रशियाला लागून असून ५६ जणांपैकी ४९ जण रशियातून आल्याची समोर आलं आहे. त्यामुळे आता रशियाला लागून असलेल्या चीनच्या शहरांमधील निर्बंध कठोर केले जाणार आहेत. सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आली असून रशियामधून येणाऱ्यांना सीमा ओलांडताच क्वॉरंटाईन केलं जाणार आहे.