डोकलाममध्ये लष्करी जाळं उभारण्याचं चीननं केलं समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 05:16 PM2018-01-19T17:16:06+5:302018-01-19T17:16:32+5:30
भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच चीननं भारताच्या लष्करी तळापासून फक्त 81 मीटर अंतरावर स्वतःच्या हद्दीत बांधकाम केलं आहे.
बीजिंग- भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच चीननं भारताच्या लष्करी तळापासून फक्त 81 मीटर अंतरावर स्वतःच्या हद्दीत बांधकाम केलं आहे. विशेष म्हणजे बांधकामाचं चीनकडून समर्थनही करण्यात आलं आहे. चीनकडून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या निर्माणाला चीननं वैध ठरवलं आहे.
सैनिकांचं जीवनस्तर उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं चीनकडून सांगण्यात आलं आहे. चीननं डोकलामच्या भूभागात केलेल्या नव्या निर्माणावर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनीही बांधकामाच्या वृत्ताचं समर्थन केलं. ते म्हणाले, मीसुद्धा यासंदर्भात बातमी वाचली आहे. मला माहीत नाही ही छायाचित्रं कुठून आली. माझ्याकडे याची सविस्तर माहिती नाही. परंतु डोकलाम मुद्द्यावर चीनची भूमिका स्पष्ट आहे. डोकलाम हा नेहमीच चीनचा एक भाग राहिला आहे आणि तो चीनच्या अधिकार क्षेत्रातच येतो. चीन आता सैनिकांच्या सुविधेसाठी बांधकाम करत आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात राहणारे सैनिक आणि जनतेला याचा फायदा होणार आहे, असंही लू कांग म्हणाले आहेत.
चीन डोकलाममध्ये एक मोठा मिलिटरी कॉम्प्लेक्स बनवत आहे. सेटलाइटच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रांवरून याचा खुलासा झाला आहे. भूतान डोकलाममधील ज्या भागावर आपला दावा सांगत आहे तिथेच चीनने लष्करी साम्राज्य उभे केले आहे. डोकलाम पठाराच्या भागात चीनने विस्तीर्ण असे रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. हेलिपॅड उभारले आहेत. वादग्रस्त भागात पूर्व आणि पश्चिमेला अनेक लष्करी तळ उभे केले आहेत. या सॅटलाईट फोटोंमध्ये चीनचा शस्त्रसाठा, तोफा कुठेही दिसलेल्या नाहीत. पण काही भागांमध्ये खोदकाम करण्यात आले असून तिथे तोफा आणल्या जाऊ शकतात. चीन या भागात आपली घातक शस्त्रास्त्रे तैनात करु शकतो याचीच भारताला सुरुवातीपासून चिंता आहे. सिक्कीमच्या डोकलामक भागात भारताची पोस्ट आहे. चीनच्या लष्करी तळापासून फक्त 81 मीटर अंतरावर ही पोस्ट आहे. युद्धाच्या प्रसंगात भारताची ही पोस्ट सहज चीनच्या टप्प्यात येईल.
या कारणास्तव संघर्षाला मिळाली ठिणगी
16 जूनपासून डोकलाममध्ये भारत आणि चीन संघर्षाला सुरुवात झाली होती. 73 दिवस दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर होते. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात त्या भागाला ट्राय जंक्शन म्हणतात. चीनने त्या ट्राय जंक्शनजवळ रस्ता बांधणीचे काम सुरु केल्यामुळे संघर्षाला सुरुवात झाली होती. कारण चीनने जर इथे रस्ता बांधला असता तर भारताचा रणनितीक दृष्टया महत्वाचा भूप्रदेश चीनच्या टप्प्यात आला असता.