China Xi Jinping : जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ उघडं पडलं, ओमिक्रॉननं बिघडवला खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 03:01 PM2022-05-21T15:01:00+5:302022-05-21T15:36:57+5:30
China Xi Jinping Coronavirus : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ आता उघडं पडत चाललं आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ आता उघडं पडत चाललं आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन कॅम्पेनही सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये चीनच्या झीरो कोविड पॉलिसीसाठी राजकीय जबाबदारीही निश्चित करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, चीनमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. तसंच मोठ्या प्रमाणात चाचण्याही करण्यात आल्या होत्या. याशिवाय सीमाही सील करण्यात आल्या होत्या. दोन वर्षांपर्यंत अनेकांनी कोरोना विषाणूचा सामना केला. तर दुसरीकडे जगातील सर्वात लोकसंख्या असलेल्या या देशात मृत्यूही कमी झाल्याचं सांगण्यात येतं. इतकंच काय तर चीनच्या झीरो कोविड पॉलिसीबाबत गेल्या वर्षी कम्युनिस्ट पक्षाच्या एका कार्यक्रमादरम्यान आनंदही साजरा करण्यात आला होता.
परंतु ओमिक्रॉननं चीनच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ उघडं पाडलं. याशिवाय सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केसलं. अधिकृतरित्या जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार अनेकांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं. तर शांघायमध्ये याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं दिसलं.
म्हणून धोका…
ऑक्सफर्ड विद्यापीठातील चीनमधील प्राध्यापक व्हिव्हियन शी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, "नेतृत्वाची निष्क्रियता, हट्टीपणा आणि दुर्लक्ष यामुळे धोका निर्माण होत आहे." असे असूनही, देशाने झीरो कोविड पॉलिसीसह जावे असे शी जिनपिंग यांचे म्हणणे आहे. चीन मधील लोकांच्या जीवनाची किंमत आर्थिक समस्यांपेक्षा अधिक असण्यावर त्यांनी भर दिला.