चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी पंगा घेणं पडलं महागात; गेल्या २ महिन्यापासून अलीबाबा समुहाचे मालक बेपत्ता
By प्रविण मरगळे | Published: January 4, 2021 11:55 AM2021-01-04T11:55:51+5:302021-01-04T11:57:48+5:30
Tech Billionaire Jack Ma Missing: नोव्हेंबरमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना जोरदार धक्का दिला, त्यांच्या अँट ग्रुपचा ३७ अब्ज डॉलर्सचा आयपीओ निलंबित केला
बीजिंग - चीनमधील तिसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे अब्जाधीश आणि अलीबाबा समूहाचे मालक जॅक मा हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. चीनमधील टेक वर्ल्डवर राज्य करणारे जॅक मा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या वादानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कुठेही दिसले नाहीत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शांघाय येथे झालेल्या भाषणात जॅक मा यांनी चीनच्या 'व्याजखोर' आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांवर कडक शब्दात टीका केली होती.
जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी एक आदर्श म्हणून काम करणाऱ्या जॅक मा यांनी सरकारला आवाहन केले होते की, 'व्यवसायात नवीन गोष्टी आणण्याच्या प्रयत्नांना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रणालीत बदल करावा, त्यांनी जागतिक बँकिंग नियमांना ‘वृद्ध लोकांचा क्लब’ म्हटलं होतं. जॅक मा यांच्या या भाषणानंतर चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी संतापली होती, जॅक मा यांची टीका कम्युनिस्ट पक्षाच्या जिव्हारी लागली. यानंतर जॅक माच्याभोवती संकटांची मालिका सुरु झाली, त्यांच्या अनेक व्यवसायावर विलक्षण निर्बंध लादले गेले.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशावरून कठोर कारवाई
नोव्हेंबरमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना जोरदार धक्का दिला, त्यांच्या अँट ग्रुपचा ३७ अब्ज डॉलर्सचा आयपीओ निलंबित केला. वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार जॅक माच्या अँट ग्रुपचा आयपीओ रद्द करण्याचा आदेश थेट चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून आला होता. त्यानंतर जॅक मा यांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येवेळी सांगितले की, मी तोपर्यंत चीनच्या बाहेर जाणार नाही जोवर अलीबाबा समूहाविरूद्ध सुरू असलेला तपास पूर्ण होत नाही.
त्यानंतर जॅक मा नोव्हेंबरमध्ये त्यांच्या टीव्ही शो 'अफ्रीका बिझिनेस हिरोज'च्या फायनलपूर्वी रहस्यमयपणे गायब झाले. एवढेच नव्हे तर त्यांचे फोटोही या कार्यक्रमातून काढून टाकले गेले. अलीबाबा समूहाचे प्रवक्ते म्हणाले की, वादामुळे जॅक मा आता जज पॅनेलच्या समितीचे सदस्य नाहीत. मात्र, शोच्य फायनलपूर्वी जॅक माने ट्विट केले की, सर्व स्पर्धकांना भेटायला ते थांबू शकत नाही. त्यानंतर त्यांच्या तीन ट्विटर खात्यांवरून कोणतीही पोस्ट केलेली नाही. पूर्वी ते सतत ट्विट करत असत.
चीनमध्ये टीकाकारांना 'शांत' करण्याचा इतिहास
चीनमध्ये आवाज दाबला जाणारा जॅक मा पहिली व्यक्ती नाही. कम्युनिस्ट पार्टी किंवा शी जिनपिंग सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या अनेक लोकांना देशात नजरकैदेत ठेवले आहे. यापूर्वी शी जिनपिंगवर टीका करणारे उद्योगपती रेन झिकियांग बेपत्ता झाले होते. कोरोनाविरूद्ध योग्य पावलं उचलली नसल्याने त्यांनी शी जिनपिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं, यानंतर त्यांना १८ वर्षासाठी तुरूंगात टाकण्यात आले. तर आणखी एक चिनी अब्जाधीश झियान जिआन्हुआ २०१७ पासून नजरकैदेत आहे.