"हिटलरला या लोकांपासून सुटका हवी होती", एका पोस्टमुळे महिलेची गेली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 09:06 PM2023-10-20T21:06:54+5:302023-10-20T21:07:53+5:30
या महिला कर्मचाऱ्याचे नाव नोझिमा हुसाइनोव्हा आहे.
हमास आणि इस्रायलमधील युद्ध १३ व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, इस्रायल हमासवर वेगाने हल्ले करत आहे. जगाच्या विविध भागातून या युद्धाविरोधात आवाज उठवला जात आहे. जिथे काही देश इस्रायलच्या कारवाईचे समर्थन करत आहेत. त्याचवेळी काही देश आणि संघटना विरोधही करत आहेत.
या सगळ्यात सिटी बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याची नोकरी गेली, आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या महिला कर्मचाऱ्याचा इस्रायल-हमास युद्धाशी काय संबंध? तर या महिला कर्मचाऱ्याचा इस्रायल-हमास युद्धाशी काहीही संबंध नाही, पण तिची एक टिप्पणी तिच्या नोकरीसाठी आपत्ती ठरली, आता ती बेरोजगार आहे. या महिला कर्मचाऱ्याचे नाव नोझिमा हुसाइनोव्हा आहे.
नोझिमा हुसाइनोव्हाने सोशल मीडिया पोस्टवर लिहिले, काही आश्चर्याची बाब नाही की, हिटलरला या सर्वांपासून सुटका का हवी होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नोझिमा हुसाइनोव्हा कोणत्या लोकांबद्दल बोलत होती. तर नोझिमा हुसाइनोव्हा त्या घटनेचा संदर्भ देत होती, ज्यात हिटलरने ज्यू समुदायाच्या निवडक हत्या करण्याचे आदेश दिले होते. जेव्हा नोझिमा हुसाइनोव्हाने अशी पोस्ट केली, तेव्हा सोशल मीडियावर लोकांनी सिटीबँकेविरोधात संताप व्यक्त केला.
“No wonder why Hitler wanted to get rid of all of them”. - Nozima Husainova
— StopAntisemitism (@StopAntisemites) October 18, 2023
Unbridled antisemitism. pic.twitter.com/GFdEMMdrI6
तुमच्या कर्मचार्यांचा ज्यू समुदायाप्रती हा दृष्टिकोन आहे का? असे एका युजरने सिटीबँकेला विचारले. तसेच ज्यावेळी सोशल मीडियावर लोकांनी नोझिमा हुसाइनोव्हाला टार्गेट करायला सुरुवात केल्यावर बँकही अॅक्शनमध्ये आली आणि आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत, असे उत्तरात लिहिले. बँक अशा द्वेषयुक्त भाषणांना समर्थन देत नाही. अशाप्रकारे सिटी बँकेने आपला हेतू स्पष्ट केला आणि नंतर बँकेच्या कर्मचाऱ्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे सांगितले. सोशल मीडियावर धर्मविरोधी टिप्पणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला आम्ही काढून टाकले आहे.
सिटी बँकेने आपल्या महिला कर्मचाऱ्याला बडतर्फ केल्यावर पुन्हा एकदा सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. थँक्स यू सिटी नो टू एंटी सेमेटिझम, असे एका युजरने म्हटले. तर बँकेकडून एवढी जलद कारवाई अपेक्षित नव्हती, असे काहींनी लिहिले. वेल डन, आम्ही सर्वजण अशा जलद कृतीचे कौतुक करतो. आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ही चांगली बातमी आहे. कंपन्या आता अशा टिप्पण्यांवर त्वरीत कारवाई करत आहेत, हे पाहणे चांगले आहे.