झुरळाचं दूध.... एेकून म्हणाल ईsss', पण भारीच गुणकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 04:55 PM2018-05-29T16:55:36+5:302018-05-29T17:01:52+5:30
काही कंपन्यांनी या दुधाची विक्रीही सुरु केली आहे. हे दूध पूर्णान्न असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
हवाई- सुपरफूडच्या नावाखाली वेगवेगळे अन्नपदार्थ, फळे खाण्याच्या लाटा येतच असतात. चित्रविचित्र दावेही केले जातात आणि काही काळानंतर या लाटा ओसरतात मात्र आता मात्र एका विचित्र सुपरफूडचा दावा केला जात आहे. हा दावा आहे झुरळाच्या दुधाबाबत. हो झुरळाचे दूध . 2016 साली या दुधाचा शोध लावण्यात आला आणि आता ते सुपरफूड म्हणून प्रचलित झाले आहे.
2016 साली भारतातील इन्स्टीट्यूट फॉर स्टेम सेल बायोलॉजी अँड रिजनरेटिव्ह मेडिसिनने या पॅसिफिक महासागरातील बेटांवर आढळणाऱ्या झुरळाचे दूध आगामी काळात सुपरफूड म्हणून नावारुपाला येईल असा दावा केला होताच. या झुरळांमध्ये स्फटिक किंवा पावडरीच्या स्वरुपात प्रथिनयुक्त पदार्थ असता, आपल्या पिलांचं पोषण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
ही झुरळं प्रामुख्याने हवाई बेटांवर आढळतात. इतर झुरळांप्रमाणे अंडी न देता ती पिलांना थेट जन्म देतात. त्यानंतर या स्फटिकरुपी "दुधाचा" वापर करुन ती आपल्या पिलांचं पोषण करतात. हे दूध आपल्या रोजच्या वापरातल्या दुधापेक्षा तीनपट प्रथिनांनी समृद्ध असते.
हे स्फटिक म्हणजे एक पूर्णान्नच आहे. त्यांच्यामध्य़े प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि शर्करा असते. जर प्रथिनांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये मानवाला आवश्यक असणारी सर्व अमायनो आम्ले असतात अशी माहिती संचारी बॅनर्जी या संशोधकांनी याबाबत दिली आहे. झुरळातून स्रवणाऱ्या या पदार्थाचा वापर करुन त्यांच्यापासून आईस्क्रीमसारखी उत्पादने तयार करण्याचा विचार काही कंपन्यांचा आहे. दक्षिण आफ्रिकेतील गोर्मेट ग्रब ही कंपनी या दुधाची एन्टोमिल्क नावाने विक्री करत आहे.