जपानी माणूस एकदम शिस्तीत जगतो. त्यांचं सामाजिक भान, नागरी वर्तन याचे जगभर दाखले दिले जातात. मात्र परवा आणि काल भरपूर जपानी लोक घराबाहेर पडले. बागांमध्ये मुलांना घेऊन गेले. सोबत आजीआजोबा. त्यांनी दिवसभर कॅम्पिंग केलं आणि सरसकट सरकारी आदेशांकडे दुर्लक्ष केलं अशा बातम्या जगभर पसरल्या. बागांमध्ये गर्दी ही एरव्ही बातमी झाली नसती मात्र कोरोनाकोंडीच्या काळात जगभरातले देश आपल्या नागरिकांना विनंती करत आहेत की, जगायचं असेल तर घरात बसा. अनेक देशांत लोक ऐकत नाहीत, ही गोष्ट वेगळी. पण म्हणून जपानी शिस्तीची माणसं आपल्या सरकारचं न ऐकता घराबाहेर पडली याचं अनेकांना जगभर आश्चर्य वाटलं. त्याच्या आंतरराष्टÑीय माध्यमांत बातम्या झाल्या.मात्र त्या बातम्यांपलिकडे जपानी माणसांचं बाहेर पडायचं एक वास्तव आहे, एक इमोशनल कारण आहे. वर्षभर ज्या दिवसांची वाट जपानी माणसं पाहत असतात, त्यासाठी वर्षभर रजा साठवतात, मान मोडून काम करतात, शिस्तीत जगतात, ते दिवस तर आलेत, पण आता सरकार म्हणतं घरात बसा. यंदा जगायचं असेल तर हे आपले महत्वाचे दिवस साजरे करू नका.काहींनी ऐकलं तर काही जपानी माणसांनी धुडकावलं ते अपील. तर त्याचं असं झालं की २९ एप्रिल ते ५ मे हा आठवडा जपानमध्ये गोल्डन वीक म्हणून साजरा केला जातो. त्याला जपानी भाषेत ‘ओगोन शुकान’ म्हणतात. या आठवड्यात जपानमध्ये विविध महत्वाचे दिन साजरे होतात. त्यांचा घटना दिवस, बाल दिन, ग्रीन डे असे अनेक दिवस. या काळात जपानी माणसं सुट्या घेतात. प्रवासाला जातात. नातेवाइकांना भेटतात. मजा करतात. फिरतात. खातात. सेलिब्रेशन असतं हे दिवस. त्याकाळात सारं महाग होतं, हॉटेल्स, विमानं, ट्रेन म्हणून कितीतरी आधी यासगळ्याचं नियोजन करु न ठेवतात. त्यासाठी पैै पै करुन पैसे साचवतात. सगळ्या कंपन्या या काळात बंद असतात. काम ठप्पं. जो तो सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतो. यंदा हा सुवर्ण सप्ताह तर आला पण सेलिब्रेशन? ते आलं नाही.. ते कशाचं करायचं, असे दिवस आहेत. कारण सरकार सतत म्हणतं आहे की, घरात बसा. प्रवास टाळा. देशात आणिबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. जपानी सरकारने लॉकडाउन केलेलं नाही कारण त्यांचा आपल्या नागरिकांच्या नागरी शिस्तीवर आणि वर्तनावर पूर्ण विश्वास आहे.मात्र पहिल्याच दिवशी अनेक जपानी लोक घराबाहेर पडले. बागेत फिरायला गेले. बागेत गर्दी झाली, टोक्योतले शिबा पार्क लोकांनी खच्चून भरले.लोक हॉटेलमध्ये जेवायला गेले. बाहेर फिरायला गेले. त्याच गर्दीच्या बातम्या झाल्या. जपान सरकारनेही आवाहन केलं आहे की, या वर्षी गोल्डन वीक साजरा करू नका. ‘ स्टे होम वीक टू सेव्हज लाइफ’ असं म्हणून हा सप्ताह साजरा करा असं त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे. दुसरीकडे जपानमध्ये ही सगळ्यात मोठी सुटी आहे. पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.‘ओकीनावा’ सारख्या शहरांत तर स्थानिकांनी पाट्या लावल्या, त्या सोशल मीडीयात पोस्ट केल्या की, ‘ आम्ही तुमचं स्वागत करत नाही, तोपर्यंत आमच्या गावांत येऊ नका. आमच्या आजीआजोबांना जगवण्यासाठी, हे करणं भाग आहे.’ जपान हा एजिंग लोकसंख्येचा अर्थात वृद्ध होत जाणारा, वृद्धांची संख्या जास्त असलेला देश आहे. त्यामुळे तिथं अधिक खबरदारी घेणं भाग आहे. एकीकडे वर्षानूवर्षे जपलेल्या रीती, भावनिक गुंतवणूक, स्वप्न, दुसरीकडे जीव वाचवण्याची धडपड अशा कात्रीत आज जपानही आहेच.
CoronaVirus News: ...म्हणून जपानी लोकांनी केली बागेत गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 2:09 AM