जीनिव्हा : चीनमधून जगातील बारापेक्षा अधिक देशांत कोरोनाचा प्रसार होऊन रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या चीनमध्ये २१३वर पोहोचली असून, कोरोनाग्रस्तांची संख्या ९,६९२ आहे. दिल्लीत आणखी ६ जणांना कोरोनाच्या संशयामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अन्य देशांतही कोरोनाची लागण झाल्याने जागतिक आणीबाणी जाहीर करीत आहोत. आरोग्यसुविधा नसलेल्या देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजू शकतो, हा चिंतेचा विषय आहे. चीनवरील अविश्वासामुळे आणीबाणी जाहीर केलेली नाही.
जागतिक आणीबाणी जाहीर केल्याने कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक मदत व साधनसामग्री मिळू शकते. मात्र, विषाणूचा फैलाव झालेल्या देशांत नागरिकांना पाठविण्यास व व्यापारावर नियंत्रणे येतील. चीनच्या काही शहरांत जाणारी विमानसेवा अनेक कंपन्यांनी स्थगित केली आहे. मॅकडोनाल्ड, स्टारबक्स यांनी चीनमधील दुकाने बंद ठेवली आहेत.
कोरोनाग्रस्त वुहानमधील भारतीयांना आणण्यास ४३२ आसन क्षमतेचे एअर इंडियाचे विमान शुक्रवारी दिल्लीहून रवाना झाले. या विमानात पाच डॉक्टर आहेत. विमान कर्मचाऱ्यांचा प्रवाशांशी थेट संपर्क होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. भारतीयांना घेऊन हे विमान शनिवारी पहाटे परतेल.चीनही पाठविणार विशेष विमानेवुहानमधून विदेशात गेलेल्या व कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी चीन अन्य देशांत विमाने पाठविणार आहे.हुबेई प्रांत व वुहानमधील सार्वजनिक वाहतूक कोरोना संकटामुळे २३ जानेवारीपासून स्थगित केली आहे. सुमारे ५० लाख लोक चीनमध्ये अन्यत्र वा विदेशात गेले आहेत. या विषाणूच्या प्रसारामुळे या नागरिकांना विदेश किंवा चीनच्या अन्य भागांत त्रासाला सामोरे जावे लागत आहे.