भारतामध्ये दीड वर्षात कोरोनाने तब्बल ५० लाख लोकांचा मृत्यू झाला असावा; अमेरिकेतील अध्ययन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 06:11 AM2021-07-21T06:11:04+5:302021-07-21T06:11:35+5:30
अमेरिकेतील नवीन अध्ययनानुसार भारतात जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान कोरोनाने जवळपास ५० लाख लोकांचा मृत्यू झाला असावा.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील नवीन अध्ययनानुसार भारतात जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान कोरोनाने जवळपास ५० लाख लोकांचा मृत्यू झाला असावा. फाळणीनंतरची ही सर्वांत मोठी मानवी शोकांतिका बनली आहे. दुसरीकडे, डेल्टा विषाणूमुळे जगभरात चिंतेची छाया पसरली आहे. सेरोलॉजिकल अध्ययन, घरोघर जाऊन करण्यात आलेले सर्व्हेक्षण, सरकारी आणि स्थानिक संस्थांची अधिकृत आकडेवारी तसेच आंतरराष्ट्रीय अंदाजाच्या आधारे हे अध्ययन करण्यात आले असून त्यासंबंधीचा अहवाल मंगळवारी जारी करण्यात आला.
सरकारी आकडेवारीपेक्षा मृतांची संख्या दहापटीने अधिक असू शकते, असे या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल भारताचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट व हार्वर्ड विद्यापीठाच्या अन्य दोन संशोधकांनी प्रकाशित केला आहे.