बीजिंग: चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना विषाणू जगभरात पसरला. वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं अनेक देशांमध्ये अक्षरश: थैमान घातलं. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचीही कोरोना संकटात वाताहत झाली. सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असलेले युरोपातील अनेक देश कोरोनाच्या लाटेसमोर अक्षरश: कोलमडले. मात्र चीननं हे संकट लवकर आवाक्यात आणलं. जगातील इतर देशांच्या तुलनेत चीन सर्वात आधी कोरोनातून सावरला आणि तिथलं जनजीवन पूर्वपदावर आलं. मात्र आता चीननं एक वेगळाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिनी नागरिकदेखील चक्रावून गेले आहेत.
चीननं देशातच करण्यात आलेल्या कोरोना लसींच्या माध्यमातून नागरिकांचं लसीकरण केलं. मात्र आता चीननं नागरिकांना बूस्टर डोस देण्याची सुरू केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आता फोसुन फार्मा आणि जर्मनीच्या बायोएनटेकची एमआरएनए लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. चीननं १४० कोटी नागरिकांचं लसीकरण केल्याचा दावा केला आहे.
फोसुन फार्मा आणि जर्मनीच्या बायोएनटेकची एमआरएनए लसीचा वापर अमेरिका आणि युरोपमध्ये केला जातो. मात्र फोसुनकडे चीनमध्ये लसीची निर्मिती करण्याचा आणि वितरण करण्याचा विशेष अधिकार आहे. बायोएनटेकच्या लसीला अद्याप तरी चिनी सरकारनं मंजुरी दिलेली नाही. ही लस विषाणूविरोधात ९५ टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.
कोरोना संकटातून सर्वात आधी बाहेर पडलेल्या चीननं लसींची निर्मिती करून त्या विविध देशांना निर्यात केल्या. मात्र चीननं तयार केलेल्या लसींचा वापर केलेल्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. मंगोलिया, सेशेल्स, बहारिनमध्ये रुग्ण संख्या वाढली. चीनमध्ये तयार झालेल्या लसी ५० ते ८० टक्के प्रभावी आहेत. मॉडर्ना आणि फायझरच्या लसींची परिणामकारकता यापेक्षा अधिक आहे.