Corona Virus: कोरोना विषाणूचे रुग्ण चीनसह ३१ देशांमध्ये; हाँगकाँग, फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:00 AM2020-02-05T03:00:23+5:302020-02-05T06:28:13+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपुरता मर्यादित नसून, जगातील सुमारे ३0 देशांतील १५0 लोकांना त्याची लागण झाली आहे.
बीजिंग : कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपुरता मर्यादित नसून, जगातील सुमारे ३0 देशांतील १५0 लोकांना त्याची लागण झाली आहे. हाँगकाँग व फिलिपिन्समध्ये या विषाणूने दोघांचा बळी घेतला आहे. चीनमध्येकोरोनाच्या संसर्गामुळे ४२५ लोक मृत्युमुखी पडले असून, २0 हजार ४00 जणांना त्याची लागण झाली आहे.
सिंगापूर (२४), जपान (२0), थायलंड (१९), हाँगकाँग (१७), दक्षिण कोरिया (१६), ऑस्ट्रेलिया (१२), मलेशिया (१0), तैवान(१९), व्हिएटनाम (१0), मकाऊ (९), भारत (३), फिलिपिन्स (२), नेपाळ (१), श्रीलंका (१) व कम्बोडिया (१) या देशांखेरीज अमेरिका (११), ब्रिटन (२), कॅनडा (४), जर्मनी (१२), इटली (२), रशिया (२), फिनलंड (१), स्पेन (१), बेल्जियम (१), स्वीडन (१), पाकिस्तान (१) आणि सौदी अरेबिया (५) या देशांत कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीला ठरवून दिलेल्या वेळेत दिवसातून एकदाच बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. चीनमार्गे समुद्रमार्गे आलेल्या ३७00 लोकांना जपानमध्ये वेगळे ठेवण्यात आले आहे. तेथून परवानगीशिवाय त्यांना बाहेर पडता येणार नाही.
एअर इंडियाची सेवा बंद
एअर इंडियाने चीनमधील शहरांत जाणारी विमाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाची विमाने ७ फेब्रुवारी ते ३१ मार्च या काळात चीनला जाणार नाहीत. दुसरीकडे चीनचे नागरिक तसेच चीनचा पासपोर्ट बाळगणारे अन्य देशांचे नागरिक यांना भारतात प्रवेश करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे.