लंडन -इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला आहे. येथे गेल्या 24 तासांत विक्रमी 55 हजारहून अधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर तब्बल 964 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. इंग्लंडमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित समोर आले आहेत. तसेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया आणि कोलोराडोनंतर आता फ्लोरिडा प्रांततही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित रुग्ण समोर आले आहेत. एवढेच नाही, तर रशियातही कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.
इंग्लंडमध्ये आढळले 55 हजारहून अधिक नवे संक्रमित -इंग्लंडमध्ये गुरुवारी जारी करण्यात आलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 24 तासांत 55 हजार 892 नवे संक्रमित आढळून आले आहेत. येथे सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता इंग्लंडमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 24 लाख 88 हजारहून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत 73 हजार 512 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अडकलेल्या इंग्लंडमध्ये गेल्या महिन्यात कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. यानंतरच येथे नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढायला सुरुवात झाली. हा स्ट्रेन इंग्लंडमधून जगभरातील अनेक देशांत पोहोचला आहे. कोरोनाचे हे रुप 70 टक्के अधिक संक्रमित असल्याचे बोलले जात आहे.
रशियातही 27 हजार नवे रुग्ण आढळून आल्याने येथील एकूण रुग्णांचा आकडा आता 31 लाख 86 हजारवर पोहोचला आहे. तर येथे आतापर्यंत एकूण 57 हजार 555 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. थायलंडमध्ये बँकॉक येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शाळा आणि मनोरंजन पार्क बंद करण्यात आली आहेत. येथे 279 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
अमेरिका आणि फ्रान्समध्ये आढळले नव्या स्ट्रेनचे रुग्ण -अमेरिकेत कॅलिफोर्निया आणि कोलोराडोनंतर आता फ्लोरिडा प्रांतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या प्रांतातील मार्टिन काउंटीमध्ये 20 वर्षांच्या नव्या रुग्णाला या स्ट्रेनच्या कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेलाच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे आतापर्यंत जवळपास दोन कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन लाख 42 हजारहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यानंतर, फ्रान्समध्येही दक्षिण आफ्रिकेशीसंबंधित स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. संक्रमित व्यक्ती नुकताच आफ्रिकेतून परतला होता. तर तैवानमध्येही इंग्लंडमधील नव्या स्ट्रेनचे दोन रुग्ण आढळून आले आहे.