बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २५९ झाली आहे, तर ११,७९१ लोकांना संसर्ग झाला आहे. आता दुसरे देश आपल्या नागरिकांना हुबेई प्रांतातून बाहेर काढण्यासाठी विमान पाठवत आहेत.
केरळात पहिला रुग्ण समोर आला आहे. वृत्त एजन्सी शिन्हुआनुसार, १,३६,९८७ अशा लोकांची ओळख पटली आहे, जे कोरोनाने पीडित लोकांच्या संपर्कात आले होते. यातील ६,५०९ जणांना वैद्यकीय निगराणीनंतर शुक्रवारी सुट्टी देण्यात आली. चीनमधील १,७९५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, तर एकूण १७,९८८ लोकांना संसर्ग झाल्याची शंका आहे. एकूण २४३ जणांना उपचारानंतर हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी संसर्गाची २,१०२ नवे प्रकरणे समोर आली आहेत. यूनिव्हर्सिटी आॅफ हाँगकाँगच्या शास्त्रज्ञांच्या अध्ययनानुसार, वुहानमध्ये ७५,८१५ नागरिकांना संसर्ग झालेला असू शकतो.
‘त्या’ प्रवाशांवर अमेरिकेची बंदी
ज्या प्रवाशांनी गत दोन आठवड्यांत चीनचा प्रवास केला होता, अशा प्रवाशांच्या प्रवेशास अमेरिकेने अस्थायी बंदी आणली आहे. मानव सेवा विभागाचे सचिव एलेक्स अजार यांनी सांगितले की, अमेरिकी नागरिक आणि स्थायी निवासींच्या कुटुंबांचे निकटचे सदस्य यांच्याशिवाय चीनचा प्रवास करून आलेल्या नागरिकांना प्रवेशबंदी असेल.
३२४ भारतीयांना चीनमधून आणले
वुहानमध्ये अडकलेल्या सहा भारतीयांना ताप असल्याने एअर इंडियाच्या पहिल्या विशेष उड्डाणात बसू दिले नाही. तेथील भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचे दुसरे विमान दिल्ली विमानतळावरून दाखल झाले आहे. तत्पूर्वी, एअर इंडियाच्या एका विमानातून चीनच्या वुहानमधून ३२४ भारतीयांना घेऊन एक विमान शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. वुहानमधून आणलेल्या भारतीयांत ३ अल्पवयीन, २११ विद्यार्थी आणि ११० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.