Corona Virus: कोरोना विषाणूचा जगभर हाहाकार सुरूच!; रुग्णांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 05:47 AM2020-03-13T05:47:20+5:302020-03-13T06:37:39+5:30

प्रवाशांना अमेरिकेत येण्यास महिनाभर बंदी, देशातील क्रीडा स्पर्धा व जत्रांवर गंडांतर

Corona Virus: Worldwide outbreak of Corona virus continues! Increase in patients | Corona Virus: कोरोना विषाणूचा जगभर हाहाकार सुरूच!; रुग्णांमध्ये वाढ

Corona Virus: कोरोना विषाणूचा जगभर हाहाकार सुरूच!; रुग्णांमध्ये वाढ

Next

जिनिव्हा : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या १ लाख २४ हजारवर पोहोचली असून, या साथीमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ४,५५० झाली आहे. ही साथ जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्यानंतर युरोपमधील प्रवाशांना अमेरिकेत येण्यास पुढील महिनाभर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. मात्र या बंदीतून ब्रिटनला वगळण्यात आले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतलेल्या ब्राझिलच्या अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेमध्ये १३०० लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे ३७ जण मरण पावले आहेत. युरोपातील प्रवाशांना अमेरिकेत येण्यास शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुढील महिनाभर बंदी घातली आहे. साथ रोखण्यासाठी युरोपमधील देशांनी पुरेशा उपाययोजना केल्या नाहीत, अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. चीन, दक्षिण कोरियामधील स्थितीवरही अमेरिका लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले. जगभरात १०७ देशांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. त्या देशातील बळींची संख्या आता ३,१६९वर पोहोचली आहे. ही माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली. चीनमधील रहिवाशांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली असली तरी आता विदेशातून चीनमध्ये परतणाºया नागरिकांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ वर
राज्यात गुरुवारी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यातील एक रुग्ण पुणे येथील असून हा ३३ वर्षीय पुरुष अमेरिकेला जाऊन आला आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील ३५ वर्षीय तरुण, तसेच हिंदुजा येथे भरती असलेला आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला ६४ वर्षांचा पुरुष रुग्ण गुरुवारी तपासणीत कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

अभिनेता टॉम हँक्स व त्याची पत्नी रिटाला कोरोनाचा संसर्ग
हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम हँक्स व त्याची पत्नी रिटा विल्सन या दोघांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हे दांपत्य सध्या ऑस्ट्रेलियामध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होते. काम करताना थकवा जाणवू लागल्याने त्या दोघांनीही वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय चाचणी अहवालातून स्पष्ट झाले.

शेकहॅण्डऐवजी नमस्ते!
कोरोनामुळे परस्परांच्या स्वागताचा हा पाश्चात्त्य रिवाज मागे पडून आता जगात अनेक ठिकाणी भारतीय पद्धतीने ‘नमस्ते’चा अंगीकार होत आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मर्कॉन यांनी यापुढे समपदस्थांचे ‘नमस्ते’ने स्वागत करण्याचे जाहीर केले. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स वेस्टमिनस्टर अ‍ॅबे येथे आले तेव्हा उपस्थितांशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे केलेला हात चटकन मागे घेत त्यांनी ‘नमस्ते’ केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत चर्चेचा विषय ठरला.

शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण
गुंतवणूकदारांची 11.27 लाख कोटींची संपत्ती पाण्यात
कोरोनाची भीती, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेली जागतिक साथ, अमेरिकेने युरोपियन देशांमधून येणाऱ्यांवर लादलेली बंदी, बाजारात सातत्यपूर्ण मोठी विक्री यांच्या परिणामामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरणी दिसून आली. भारतामधील शेअर बाजारातही गुरुवारी मोठी घसरण झालेली बघावयास मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदविली. निफ्टीने तिहासातील सर्वाधिक घसरणीची नोंद केली आहे. गुंतवणूकदारांची एका दिवसात ११.२७ लाख कोटींची मालमत्ता वाहून गेली. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात २९१९.२६ अंश म्हणजेच ८.१८ टक्के घट झाली आहे.

आयपीएलही प्रेक्षकांविना?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत व दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने रिकाम्या स्टेडियवर होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने गुरुवारी ही घोषणा केली. परंतु आयपीएल आयोजनाविषयी बीसीसीआयने अद्याप मौन पाळले आहे. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदा आयपीएलचे आयोजन प्रेक्षकांविना करण्याचे संकेत दिले आहेत. आयपीएल संचालन परिषदेच्या शनिवारी होणाºया बैठकीत याबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.
 

Web Title: Corona Virus: Worldwide outbreak of Corona virus continues! Increase in patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.