Corona Virus: चीननं घेतला कोरोना व्हायरसचा धसका; हस्तांदोलन करण्यावरही घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:23 AM2020-01-27T10:23:41+5:302020-01-27T10:33:24+5:30
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे.
शंघाई - चीनमध्ये दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसने भयंकर स्वरुप धारण केलं आहे. कोरोना व्हायरस दिवसेंदिवस चीनमध्ये पसरत असून अनेक जण या आजाराचा शिकार होत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या आजाराचं कोणतंही लक्षण लगेच आढळून येत नाही. हा आजार इतका धोकादायक आहे की, वुहानमध्ये लोकांना स्वत:ला घरात कैद करुन ठेवलं आहे. शहरात कोणालाही मुक्त फिरण्याची परवानगी नाही. इतकचं काय तर पेइचिंगमध्ये लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन करु नये असंही बजावण्यात आलं आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील आरोग्य यंत्रणा चीनच्या बाहेर थायलँड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि फ्रान्सपर्यंत या व्हायरसला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
नव्या व्हायरसने जग सतर्क
अद्याप या व्हायरसची माहिती नसल्याने जगाला सतर्क करण्यात आलं आहे. हा भयंकर आजार कशामुळे पसरत आहे याची माहिती आरोग्य यंत्रणांकडे नाही. या आजारामुळे न्यूमोनिया होऊ शकतो तसेच आणखी गंभीर आजार उद्भवू शकतो.
आजाराची लक्षणाची अपुरी माहिती
चीनचे आरोग्य मंत्री शीहावे यांनी सांगितलं की, या व्हायरसचा परिणाम १४ दिवसांपुरता आहे. यादरम्यान हा व्हायरस संसर्गजन्य रोगासारखा लोकांच्या शरीरात पसरत आहे. या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं कठीण होतंय. २००२-०३ मध्येही अशाप्रकारे हा व्हायरस पसरल्यामुळे ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सध्या २ हजार लोक या व्हायरसमुळे पीडित आहे तर ८० जणांचा मृत्यू झाला आहे.
चीनमध्ये हस्तांदोलन करण्यास बंदी
चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना एकमेकांशी हस्तांदोलन करु नये असं आवाहन केलं आहे. चीनच्या नववर्षानंतर शाळा-कॉलेज सुरु होणार होते मात्र त्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे. हुबेई प्रांताच्या आजूबाजूच्या चार शहरांत शियानिंग, शियोगान, एन्शी आणि जिजांग शहरांत प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंच्या धास्तीने शांघाई डिज्निलँड या आठवड्यात पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन येत्या दहा दिवसांत नवीन रुग्णालय उभं करणार आहे. वुहान शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार असून युद्धपातळीवर त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.