लंडन - जगभरात कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. जगातील २०० देशांना कोरोना फटका बसला आहे. भारतातही कोरोना व्हायरस रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. येत्या १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन असणार आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. तरीही अनेकदा लोकांकडून लॉकडाऊनचं उल्लंघन होत आहे. अत्यावश्यक सेवेची कारणं देत लोकांकडून लॉकडाऊनचं उल्लंघन होत आहे. मात्र, लॉकडाऊन उल्लंघन केवळ भारतातच नाही, तर इंग्लंडमध्येही झाल्याचं दिसून आलं आहे.
महाराष्ट्र किंवा देशातील नागरिक लॉकडाऊनच उल्लंघन करत आहेत, म्हणून पोलिसांकडून वेगवेगळ्या संकल्पना लढवून नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही बाब केवळ भारतातच नसून जगभरात लॉकडाऊन असलेल्या विविध देशांमध्ये पाहायला मिळते. लंडनमधीलपोलिसांनीही ट्विटरवरुन एक फोटो शेअर करत, नागरिकांना घरीच राहण्याची कळकळीची विनंती केली आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बहुतांश देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, लॉकडाऊन कालावधीतही काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. कुणी कंटाळा आला म्हणून, तर कुणी खरंच लॉकडाऊन आहे का म्हणून बाहेर पडतंय. कुणी अत्यावश्यक सेवांची कारणं देत घराबाहेर पडत आहे. लंडनमध्ये अशीच एक लॉकडाऊनच्या नियमांच उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. घरात बसून कंटाळा आल्याने एक व्यक्ती आपली चारचाकी गाडी घेऊन घरातून बाहेर पडली होती. मात्र, या व्यक्तीचा गाडीसह अपघात झाला आहे.
काळ्या रंगाची फोर्ड विस्टा कंपनीची गाडी घेऊन ड्रायव्हर घरातून बाहेर पडला होता. लॉकडाऊन असल्याने सध्या घरात राहण्यास सांगितले आहे. मात्र, कंटाळा आला म्हणून हे महाशय चारचाकी गाडी घेऊन नियमांचे उल्लंघन करत घराबाहेर पडले. त्यानंतर, एका घरासमोर यांची गाडी धडकली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोदं केली असून ड्रायव्हरवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, सध्या आम्ही आणि रुग्णवाहिकेचे कर्मचारी अतिशय कामात व्यस्त आहोत. त्यामुळे आम्हाला आणखी दुसरं काम नकोय, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
एक्सेस रोड पोलिसींग युनिटने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या कारचे फोटो ट्विट केले आहेत. तसेच, आम्ही कामात खूप व्यस्त आहोत, कृपया नागरिकांनी घरातच बसावे, असे आवाहन या पोलिसांनी केले आहे.