जिनेव्हा - कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात चिंताजनक पातळीपर्यंत पोहोचला आहे. भारतातही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. दरम्यान, या चिंतेत अधिक भर टाकणारा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला आहे.
कोरोना विषाणू (COVID-19) हा स्वाईन फ्लूपेक्षा दहा पट अधिक जीवघेणा असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात केला आहे. स्वाईन फ्लू ला H1N1 या नावानेही ओळखले जाते. 2009 मध्ये स्वाईन फ्लू जागतिक साथीचे कारण ठरला होता.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनोम घेब्येयियस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सांगितले की, कोरोना विषाणूचा फैलाव स्वाईन फ्लूच्या तुलनेत वेगाने होतो. तसेच 2009 मधील स्वाईन फ्लूच्या तुलनेत कोरोना विषाणू 10 पट अधिक जीवघेणा आहे.
दरम्यान, भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 352 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे नवे 905 रुग्ण सापडले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 980 जण बरे झाले आहेत. तर जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.