Coronavirus Delta Variant : डेल्टा विषाणू, संथ लसीकरणामुळे साथीचा धोका कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 05:51 AM2021-07-11T05:51:04+5:302021-07-11T05:53:03+5:30
जागतिक आरोग्य संघटना : आफ्रिकेत मृत्यूदर वाढला; २४ तासांत जगात ५ लाख रुग्ण. लोकांनी काळजी न घेता आपापसात मिसळल्यानं धोका पूर्वीइतकाच, सौम्या स्वामिनाथन यांचं मत
जिनिव्हा : डेल्टा विषाणूचा प्रसार तसेच अनेक देशांत धीम्या गतीने होत असलेले लसीकरण, लोकांचे खबरदारी न घेताच आपसात मिसळणे वाढल्याने कोरोना साथीचा धोका पूर्वीइतकाच कायम आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. आफ्रिकेमध्ये गेल्या दोन आठवड्यांत कोरोनामुळे मृत्यूदर ३० ते ४० टक्क्यांनी वाढला असल्याचे त्यांनी सांंगितले.
त्या म्हणाल्या की, जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाचे सहा विभाग कल्पिले आहेत. त्यापैकी पाच विभागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत जगभरात पाच लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून ९३०० जण मरण पावले आहेत. हे पाहता या साथीचा वेग मंदावला आहे असे म्हणता येणार नाही. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, लोक अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. ते नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत. तसेच विविध ठिकाणी प्रतिबंधक नियम शिथील करण्यात आले आहेत. कोरोनाच्या मूळ विषाणूमुळे बाधित झालेली व्यक्ती तीन जणांना बाधित करू शकत असे. पण डेल्टा विषाणूग्रस्त व्यक्ती आठ जणांना संसर्ग देऊ शकते. त्यांनी सांगितले की, काही देशांनी केवळ प्रतिबंधक नियम शिथील केले नाहीत तर मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यावरील बंधनेही सैल केली.
चीनमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांत मोठी वाढ
कोरोना साथ सुरू असतानाच चीनमध्ये आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनमधून कोरोना साथीचा उगम होऊन ती साऱ्या जगभर पसरली. आता तेथील आफ्रिकन स्वाइन फ्लूचा अन्य देशांत फैलाव होतोय का यावर जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहे.
कोव्हॅक्सिनला WHOची ॲागस्टमध्ये मान्यता?
कोवॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष आश्वासक आहेत. या लसीला जागतिक आरोग्य संघटना ॲागस्ट महिन्याच्या मध्याला किंवा अखेरीस मान्यता देण्याची शक्यता आहे असेही त्या संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.
कोरोना विषाणू्च्या विविध प्रकारांवर कोवॅक्सिन लस परिणामकारक ठरते का, याचे प्रयोग करण्यात आले. डेल्टा विषाणूविरोधात कोवॅक्सिनची परिणामकारकता कमी आहे असेही निरीक्षण स्वामीनाथन यांनी नोंदविले.