वॉशिंग्टन : कोरोनाविरोधातील सिंगल डोस व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी असल्याचा दावा अमेरिकेतील फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने (Johnson & Johnson) केला आहे. सिंगल डोस लस गंभीर किंवा अत्यंत गंभीर आजाराच्या विरूद्ध 85% प्रभावी असल्याचे आढळले आहे.
कंपनीने असा दावा केला आहे की, लोकांना रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूपासून वाचवले. लस घेतलेल्या 8 लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांमधून हे उघडकीस आले आहे की, ही लस डेल्टासह सर्व प्रकारच्या व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहे. जॉन्सन अँड जॉन्सनचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी पॉल स्टॉफल्स म्हणाले, "आज जाहीर केलेल्या स्टडीनुसार जॉन्सन अँड जॉन्सनची लस जगभरातील लोकांचे जीवन वाचविण्यात मदत करते."
लसीच्या पहिल्या डोसच्या 29 दिवसांत डेल्टा व्हेरियंटवर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलसह या लसीचा प्रभाव जागतिक स्तरावर सारखाच असल्याचे कंपनीने म्हटले होते. स्टडीदरम्यान, या भागांमध्ये बीटा आणि जीटा व्हेरिएंटचे प्रमाण अधिक आढळले होते. जॉन्सन अँड जॉन्सनचे आणखी एक अधिकारी जोहान वान हूफ यांनी सांगितले की, "आम्ही खूप आनंदी आहोत. आम्हाला खात्री आहे की या लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता नाही आणि ती सर्व व्हेरिएंटवर प्रभावी आहे."
दरम्यान, भारत सरकार सुद्धा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसोबत लसींच्या मुद्द्यावर चर्चा करत आहे. अलीकडेच जॉन्सन अँड जॉन्सनच्या भारतीय युनिटच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्था 'एएनआय'ला सांगितले होते की, 'डीसीजीआयने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, आता भारतात अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे क्लिनिकल स्टडीज पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. आम्ही भारत सरकारसोबत चर्चा करत आहोत आणि भारतात आमची सिंगल डोस देण्याची क्षमता कशी वाढवायची हे पाहत आहोत.