कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 52 कोटींचा टप्पा पार केला असून जगभरातील एकूण रुग्णांची संख्या 521,349,566 वर पोहोचली आहे. तर 6,288,525 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आतापर्यंत 491,919,504 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. याच दरम्यान चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
चीन सोमवार ते बुधवार या कालावधीत 12 जिल्ह्यांमध्ये तीन अतिरिक्त सामूहिक न्यूक्लिक अॅसिड चाचण्या आयोजित करेल. चीनच्या राजधानीत कोविड-19 संसर्गाची नवीन प्रकरणे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हे 12 जिल्हे म्हणजे डोंगचेंग, जिचेंग, चाओयांग, हैडियान, फेंगटाई, शिजिंगशान, फांगशान, टोंगझोउ, शुनी, चांगपिंग, डॅक्सिंग आणि बीजिंग आर्थिक-तंत्रज्ञान विकास क्षेत्र आहेत.
12 जिल्ह्यांमध्ये झाल्या चाचण्या
सिन्हुआ वृत्तसंस्थेने बीजिंग नगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे की, आरोग्य आयोगाच्या ताज्या हालचालीमध्ये 13 ते 15 मे या कालावधीत 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये मेंटौगौ, पिंग्गु, हुआरौ, मियुन आणि यानकिंग येथील रहिवाशांना नियमित न्यूक्लिक अॅसिड चाचणी करणे आवश्यक आहे.
वांग म्हणाले, 13-15 मे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर चाचणी करताना आरोग्य अधिकाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक आणि कुरिअर क्षेत्रे तसेच बांधकाम साइटसह प्रमुख उद्योग आणि अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. बीजिंग म्युनिसिपल सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलचे डेप्युटी हेड पांग जिंगहुओ यांनी मीडियाला सांगितले की, बीजिंगमध्ये शनिवारी दुपारी 3 ते रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 55 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.