इटलीने 12 जुलै रोजी युरो कप (Euro Cup 2020) फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. इटलीमधील अनेक शहारांमध्ये या विजेतेपदाचं जोरदार सेलिब्रेशन सध्या सुरू आहे. या विजयाच्या आनंदामध्ये लोकांना कोरोना महामारीच्या नियमांचा विसर पडला आहे. तब्बल दीड वर्षानंतर लोकांना आनंद साजरा करण्याची खूप मोठी संधी मिळाली आहे. कोरोनाच्या नियमांचे तीन-तेरा आणि मास्क, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. कोरोनाचा विचार न करता लोक मोठ्या संख्येने आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र याच दरम्यान इटलीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे.
इटलीने युरो कप जिंकताच रोम, मिलान, फ्लोरेंस या शहरांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत मोठी पार्टी केली आहे. मास्क न वापरता तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडून अनेक ठिकाणी पार्टी केली. या सेलिब्रेशनंतर इटलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एक जुलै रोजी इटलीमध्ये 879 कोरोनाच्या नव्या रुग्णाची नोंद झाली होती. गेल्या रविवारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या 3127 झाली आहे. गेल्या 6 दिवसांपासून यामध्ये वाढ होत आहे. कमी कोरोना चाचण्या करण्यात आल्याने काही दिवसांपूर्वी कमी रुग्णांची नोंद झाली होती. मात्र आता कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
युरो कप स्पर्धेत मिळालेल्या विजयानंतरच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असं वृत्त रॉयटर्ल या न्यूज एजन्सीनं दिलं आहे. कोरोना संक्रमण झालेल्या लोकांचं सरासरी वय 28 आहे. लोकांनी पार्टीनिमित्त केलेल्या गर्दीमुळेच कोरोनाचा प्रसार वेगानं झाला असल्याचं इटलीचे आरोग्य प्रमुख फ्रँको लोकेटली यांनी सांगितले. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश होतो. इटलीमध्ये आजवर कोरोनामुळे 1, 27, 867 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान यावर्षी इटलीमध्ये रोज 3 ते 4 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता पुन्हा एकदा संक्रमणाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इटलीमध्ये गेल्या वर्षी देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णालयामधील बेड्सची कमतरता, मेडिकल सुविधांचा अभाव, डॉक्टरांची अपुरी संख्या यामुळे इटलीचे जनजीवन विस्कळीत झाले होते. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.