जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांना कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. पाकिस्तानमध्ये वेगाने कोरोनाचा प्रसार होत असतानाच इम्रान खान यांनी गुरुवारी चीनच्या कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर देखील ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
'या' छोट्याशा देशाची कमाल! प्रत्येकाला मिळाली कोरोना लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान एका छोट्या देशाने कमाल केली आहे. आपल्या देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली आहे. लसीकरण पूर्ण करणारा तो जगातील पहिलाच देश ठरला आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, जिब्राल्टरमधील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचा डोस देण्यात आला आहे. जिब्राल्टरची लोकसंख्या जवळपास 33,000 आहे. या ठिकाणी कोरोनाचे चार हजार 263 रुग्ण आढळून आले होते. तर देशातील 94 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. मॅट हॅनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना "मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की काल (बुधवारी) जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे" असं म्हटलं आहे.
कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. फ्रान्समध्ये तिसरी लाट आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने रौद्ररुप धारण केलं असून पॅरिसमध्ये पुन्हा एकदा एक महिन्याच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 15 भागांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी याआधी लागू झालेल्या लॉकडाऊनपेक्षा या लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल आहेत असं म्हटलं आहे. तसेच या लॉकडाऊनमध्ये शाळा आणि जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सुरू राहणार आहेत. लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी असली तरी सोशल डिस्टेसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करावाच लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.