CoronaVirus News: अमेरिकेनंतर आता रशियात कोरोना 'बेलगाम'; 'या' बाबतीत इटली अन् स्पेनलाही टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 09:34 PM2020-05-11T21:34:35+5:302020-05-11T21:43:31+5:30
अमेरिका, इटली, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तर कोरोनाने 2 लाखवर लोकांचा बळी घेतला आहे. या पाच देशात कोरोनाने सर्वाधिक हाहाकार घातला. मात्र, आता रशियाही या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
मॉस्को : कोरोना व्हायरस संपूर्ण जगातच बोकाळत सुटला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तर कोरोनाने 2 लाखवर लोकांचा बळी घेतला आहे. या पाच देशात कोरोनाने सर्वाधिक हाहाकार घातला. मात्र, आता रशियाही या देशांच्या यादीत सामील झाला आहे. रशियाने कोरोनाबाधितांच्या संख्येत आता इटली आणि स्पेनलाही मागे टाकले आहे.
रशियात कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 21 हजारवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत येथे तब्बल 11,656 नवे रुग्ण आढळून आले. याच बरोबर अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीतही रशिया अमेरिका आणि इंग्लंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रशियात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1.73 लाख एवढी आहे. तर अमेरिकेत 10.30 लाख आणि इंग्लंडमध्ये 1.86 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
रशियात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 95 जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर येथील मृतांचा आकडा आता 2009वर पोहोचला आहे. रशियातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की येथील तपासणीची संख्या वाढल्याने अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. येथे 80 हजारवर लोकांचा कोरोनाने बळी घेतला. इंग्लंडमध्ये 32 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या शिवाय इटलीमध्ये 30 हजार तर स्पेन आणि फ्रान्समध्ये प्रत्येकी 26 हजार लोकांचा कोरोनामुळए मृत्यू झाला आहे. तर भारतातही आतापर्यंत 2206 जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.