वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीसाठी प्रयत्न सुरू असून तिची माहिती चोरण्याचे चीनच्या दोन हॅकरनी प्रयत्न केले, असा खळबळजनक आरोप अमेरिकेने केला आहे. याच हॅकरनी याआधी संरक्षण खात्याशी संबंधित कंत्राटे, तसेच सौरऊर्जा उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यांच्या कामाची महत्त्वाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता, असे अमेरिकेने म्हटले आहे.
ली शीओयू, डाँग झियाझी अशी त्या दोन चिनी हॅकरची नावे आहेत, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे. या हॅकरनी आणखी कोणतेही नुकसान करू नये म्हणून योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित गोष्टी चोरण्याचा उद्योग हे दोन चिनी हॅकर करत असत. असाच आरोप अमेरिका व अन्य प्रगत देशांनी रशियावर केला होता. पण आता हेच आरोप चीनवरही होत आहेत. अमेरिकी तंत्रज्ञान चोरण्याच्या चीनच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी त्याच्याशी अमेरिकेने २०१५ला एक करार केला. त्यानंतरही चीनच्या कारवाया कमी झालेल्या नाहीत. मात्र ली शीओयू, डाँग झियाझी या दोन हॅकरनी चिनी लष्कराच्या सहकार्याने हॅकिंगचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
२०१६पासून प्रयत्न
२०१६ व २०१७ या दोन वर्षांत या दोन हॅकरनी अमेरिकेतून संरक्षणविषयक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेने केलेल्या टीकेबद्दल चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले की, सायबर हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.