जीनिव्हा : जगभरात ‘कोविड-१९’चा संसर्ग झालेल्यांची संख्या अतिशय वेगाने वाढत असून, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीपर्यंतच्या २४ तासांत जगात तब्बल १ लाख ८३ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एका दिवसात इतके रुग्ण कधीच आढळले नव्हते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.दोनच दिवसांपूर्वी आपण अत्यंत धोकादायक वळणावर येऊ न पोहोचलो आहोत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. त्यानंतरच्या २४ तासांतच १ लाख ८३ हजार जणांना संसर्ग झाल्याचे आढळल्याने सर्वच चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणूचा वेगाने होत असलेला संसर्ग आणि लोकांचे चाचणी घेण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे हा आकडा वाढल्याचे दिसत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले.गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे ५४ हजार ७७१ नवे रुग्ण एकट्या ब्राझीलमध्ये आढळून आले. त्यापाठोपाठ अमेरिकेचा क्रमांक लागतो. तिथे ३६ हजार ७१७ नवे रुग्ण आढळले आणि भारतात नव्या रुग्णांची संख्या १५ हजार ४00 च्या आसपास होती, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. म्हणजेच जगभरात जे १ लाख ८३ हजार रुग्ण आढळले, त्यापैकी एक लाखांहून अधिक रुग्ण ब्राझील, अमेरिका व भारत या तीन देशांमधील आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळपर्यंत जगभरातील रुग्णांची संख्या ८७ लाखांहून अधिक झाली आहे. तसेच एकूण मृतांचा आकडा ४ लाख ६१ हजार ७१५ झाला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगात रोज सरासरी ४ हजार ७४३ मृत्यू होत आहेत. नव्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये दोन तृतीयांश एकट्या अमेरिकेतील आहेत. अमेरिकेत नव्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असून ब्राझील, दक्षिण आफ्रिका व लॅटिन अमेरिका येथील देशांतही विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. चीनमध्येही नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. (वृत्तसंस्था)>निर्बंध होत आहेत कमीकोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी अनेक देशांनी याआधी घातलेले निर्बंध हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने तर रेस्टॉरंट, सलून आणि कॅसिनो सुरू करण्यास परवानगी दिली आहे. स्पेनमध्ये १४ मार्च रोजी लागू केलेली राष्ट्रीय आणीबाणी पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे. आता तेथील लोकांना कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य आले आहे. मात्र लोकांनी स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन तेथील सरकारने केले आहे. या रोगाची दुसरी लाट येऊ शकते. त्यामुळे कोणीही गाफिल राहू नये, असा इशारा स्पेनच्या सरकारने जनतेला दिला आहे.
CoronaVirus News : जगभरात २४ तासांत सापडले १ लाखांहून अधिक रुग्ण, ब्राझील, अमेरिका अन् भारताला WHOचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 4:09 AM