लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोना विषाणूच्या निर्माण होणाऱ्या नवनव्या व्हेरिएंट्सने जग अस्वस्थ असतानाच पुन्हा एकदा नव्या व्हेरिएंटची चाहूल वैज्ञानिकांना लागली आहे. सध्याच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा उप-वंश शास्त्रज्ञांना आढळला आहे. त्याला बीए.२ असे नाव देण्यात आले आहे.
किती बाधित सापडले?
- बीए.२चा प्रसार होत असून आतापर्यंत ४२६ लोकांना त्याची बाधा झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
- ब्रिटनसह भारत, डेन्मार्क, स्वीडन आणि सिंगापूर या ठिकाणी बीए.२चे बाधित आढळले आहेत.
- डेन्मार्कमध्ये सर्वाधिक बाधित आहेत. बीए.२ मुळे डेन्मार्कमध्ये बाधितांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
- ओमायक्रॉनच्या या उपवंशाचा सुमारे ४० देशांमध्ये फैलाव झाला असावा, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
कोणी शोधला नवा व्हेरिएंट?
- ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेच्या शास्त्रज्ञांना बीए.२ या नव्या व्हेरिएंटचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञ या व्हेरिएंटचा अभ्यास करत असून त्यास ‘चिंताजनक’ संबोधण्यात आले नाही.
काय म्हणतात तज्ज्ञ?
- ब्रिटिश आरोग्य सुरक्षा संस्थेच्या संचालक डॉ. मीरा चांद यांच्या मते वातारणाशी जुळवून घेत अधिकाधिक उत्परिवर्तित होणे हा कोणत्याही विषाणूचा स्थायीभाव असतो. त्यामुळे येत्या काळातत कोरोनाचे विविध व्हेरिएंट्स येत राहतील.
- डेन्मार्कमधील स्टेटेन्स सीरम इन्स्टिट्यूटचे संशोधक अँड्रेस फॉम्सगार्ड यांनी ओमायक्रॉनच्या नव्या उप-वंशाने बाधित केलेल्या रुग्णांच्या संख्येबद्दल आश्चर्य व्यक्त करताना या नव्या व्हेरिएंटमुळे लोकांची प्रतिकारशक्ती कमी होण्याची भीती व्यक्त केली.
- डेन्मार्कमध्ये बीए.२ व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असले तरी त्यामुळे कोणाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही.