Coronavirus: अबब! कोरोनाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने खजिना उघडला; रक्कम ऐकून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 09:29 AM2020-03-25T09:29:21+5:302020-03-25T09:45:22+5:30
पाकिस्तानात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत असताना विरोधकांकडून पंतप्रधान इमरान खान यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप केला जात होता.
इस्लामाबाद – कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडलेल्या पाकिस्तानने महामारीपासून वाचण्यासाठी खजिना खुला केला आहे. पंतप्रधान इमरान खान यांनी मंगळवारी १.१३ ट्रिलियन( १ लाख १३ हजार कोटी) रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. कोरोनाविरुद्ध लढा आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी इमरान खान यांनी आर्थिक निधीची घोषणा केली आहे.
पाकिस्तानात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत असताना विरोधकांकडून पंतप्रधान इमरान खान यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप केला जात होता. त्यानंतर इमरान खान यांनी अशाप्रकारची घोषणा केली आहे. त्याचसोबत पेट्रोल,डिझेलच्या किंमती १५ रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. महागाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानाचं कोरोना व्हायरसमुळे कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तानात आतापर्यंत ९९० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात याचा सर्वाधिक फटका बसला आहे. याठिकाणी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ४१० इतकी आहे. यासह पंजाबमध्ये २९६ तर बलूचिस्तानमध्ये ११० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण पाकिस्तानात सैन्याला पाचारण करण्यात आलं आहे. बिघडलेली परिस्थिती पाहता पंतप्रधान इमरान खान यांनी जागतिक बँक आणि अन्य देशांकडे कर्जासाठी विनवणी केली. पाकिस्तानला मिळालेल्या कर्जानंतर पंतप्रधान इमरान खान यांनी १.१३ ट्रिलियनचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. इमरान खान यांनी सांगितले की, या पॅकेजतंर्गत मजूरांना २०० अरब डॉलर(४ हजार रुपये), संकटात असलेल्या कुटुंबाला १५० अरब डॉलर(३ हजार) रुपये देणार आहे. तसेच गरीब कुटुंबाला मिळणाऱ्या भत्त्यातही १ हजारांनी वाढ करण्यात आली आहे.
पाकिस्तानमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्यानंतर पंतप्रधान इमरान खान यांनी हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 7 लोकांचा बळी गेला आहे. कोरोना संकट पाहता देशातील सर्व प्रवासी गाड्या 31 मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. चीन आणि दक्षिण कोरियानंतर आता पाकिस्तानात फोनद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात येत असलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. कोणती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळली तर याविषयी त्यांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे. चीन आणि दक्षिण कोरियामध्येही फोन ट्रॅकिंग पद्धत अवलंबली गेली होती जी यशस्वी झाली आहे. त्याच वेळी, इस्राईल फोनद्वारे कोरोना रूग्णांच्या हालचालींवर नजर ठेवत आहे.